पुणे : रेल्वेने आता वीजबचतीचे पाऊल उचलले आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. आता पुणे रेल्वे स्थानकावर १६०० केव्हीए क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यात आले आहे. या उपकेंद्रामुळे रेल्वेकडून वीजबचत होणार असून, त्यातून रेल्वेचा वर्षाला सुमारे पावणेसात लाख रुपयांचा खर्च वाचणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे रेल्वे स्थानकावरील हे उपकेंद्र अधिक स्थिर आणि सातत्यपूर्ण वीज पुरवठा व्हावा, या पद्धतीने विकसित केलेले आहे. या उपकेंद्राच्या माध्यमातून पुणे स्थानक, रेल्वे रुग्णालय, रनिंग रूम आणि गुड्स शेड या ठिकाणी वीजपुरवठा केला जाणार आहे. या ठिकाणी वार्षिक १७ लाख युनिट वीज लागते. नवीन उपकेंद्रामळे विजेच्या बिलात वर्षाला ६ लाख ८० हजार रुपयांची बचत होणार आहे. या उपकेंद्राचे उद्घाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता तरुण सुयाल हेही उपस्थित होते.

आणखी वाचा-पीएमपी बसवर झाड कोसळले

नवीन उपकेंद्र अत्याधुनिक तंत्रज्ञान उपकरणे आणि ट्रॅक्शन उपकेंद्र थीमवर आधारित आहे. अशा प्रकारचे मध्य रेल्वेवरील हे पहिलेच उपकेंद्र आहे. हे उपकेंद्र ९९ टक्क्यांपर्यंत क्षमतेने चालणारे आहे. त्यामुळे ऊर्जा हानी कमी होऊन बचत जास्त होते. महावितरणद्वारे दोन वीज पुरवठा फीडरच्या माध्यमातून या उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात आला आहे. आधी असलेली ८०० केव्हीए क्षमतेची दोन उपकेंद्रे बदलून त्या ठिकाणी हे नवीन उपक्रेंद्र बसवण्यात आले आहे. या उपकेंद्राची क्षमता दुप्पट असल्यामुळे विद्युत ऊर्जाभार व भविष्यात वाढणारी विजेची गरज पूर्ण करण्यास मदत मिळेल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी दिली.

नवीन उपकेंद्राची वैशिष्ट्ये

  • अत्याधुनिक उपकरणांचा वापर
  • वीजपुरवठा अधिक स्थिर राहणार
  • रिमोट मॉनिटरिंगची सुविधा
  • डेटा रेकॉर्डिंगची सुविधा
  • वीजपुरवठा खंडित होताच तातडीने निदान
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intelligence of the railway saving lakhs in electricity bills pune print news stj 05 mrj
Show comments