पुणे : आशिया खंडाला नैऋत्य मोसमी पावसाची चाहूल मे महिन्याच्या अखेरीपासून लागते. जून ते सप्टेंबर हे चार महिने आशिया खंडात पावसाळ्याचे असतात. पण, यंदा जून महिन्यात आशियाई देशांनी प्रखर उन्हाळ्याचा अनुभव घेतला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) वतीने जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, भारतासह बहुतेक आशियाई देश मार्च महिन्यापासून आजपर्यंत उष्णतेच्या लाटांचा सामना करीत आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात राजधानी दिल्लीत ५०, पाकिस्तानमधील सिंध प्रांतात ५२ आणि फिलिपिन्समध्ये ५३ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
हेही वाचा…देशभरात घरे महागली! जाणून घ्या घरांच्या किमती वाढण्याची कारणे…
उष्णतेच्या झळांमुळे पाकिस्तान, उत्तर भारत, फिलिपिन्समध्ये जनजीवन विस्कळीत झाले. प्रामुख्याने भारतात उष्णतेच्या लाटांची संख्या वाढली. उत्तर भारतात सरासरी कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर राहिले. जागतिक तापमानवाढ, एल निनोचा प्रभाव, हरितगृह वायूचे वाढते उत्सर्जन आदींमुळे तापमानवाढ होत असल्याचे ‘यूनडीपी’ने म्हटले आहे. तापमान वाढीमुळे गरीब, शेतीची कामे करणारे मजूर, किरकोळ विक्रेते आदींना गंभीर परिणामांचा सामना करावा लागला. आशियातील शहरे तापमानवाढीची बेटे ठरली. प्रामुख्याने शहरांना उष्ण रात्रींचा सामना करावा लागल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याचेही ‘यूएनडीपी’ने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा…पुणेकर हवाई प्रवाशांचे आणखी महिनाभर हाल? खुद्द मंत्री मोहोळ यांनीच दिली कबुली
१४ जून ठरला सर्वांत उष्ण
‘युरोपिअन सेंटर फॉर मीडिअम रेंज वेदर फॉरकास्ट’ने दिलेल्या माहितीनुसार (ईसीएमआरडब्ल्यूएफ) १४ जून हा जगभरात जून महिन्यातील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला आहे. १९९१ ते २०२० या काळात जून महिन्यात सरासरी तापमान १६.१० अंश सेल्सिअस आहे. १४ जून रोजी उच्चांकी १६.८० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. एल निनो सध्या निष्क्रिय अवस्थेकडे जात आहे. पण, त्याचे परिणाम अजून दिसत असल्याचेही संस्थेने म्हटले आहे.