लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने रत्नागिरी, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भात प्रति तास ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन-तीन दिवस मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात ओडिशालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. दक्षिण महाराष्ट्र ते मध्य केरळपर्यंत किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार आहे. पश्चिम घाटाच्या परिसरात पुणे आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

आणखी वाचा-दूध पावडर, मका, खाद्यतेलांच्या आयातीच्या निर्णयाने देशांतर्गत बाजारात संभ्रमावस्था

दरम्यान, मोसमी पाऊस शुक्रवारी (२८ जून) राजधानी दिल्लीत दाखल झाला. राजस्थानमधील जैसलमेर, चुरू, दिल्ली, अलिगड, कानपूर, गाझीपूर खेरी, मुरादाबाद, उना, पठाणकोट आणि जम्मू अशी मोसमी पावसाची उत्तर सीमा आहे. पुढील दोन दिवसांत उर्वरित राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा आणि जम्मूमध्ये मोसमी पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे.

शनिवारसाठी हवामान विभागाचा इशारा

नारंगी इशारा – रत्नागिरी, रायगड, पुणे.

पिवळा इशारा – सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर आणि विदर्भ.