खासगी आणि सरकारी भागीदारीतून ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा’मध्ये (एमआयडीसी) तेथील उद्योग समूहांच्या सहकार्याने कौशल्य विकसित करणारी अत्याधुनिक ‘आयटीआय’ सुरू करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केली. राज्य सरकार प्रत्येकाला नोकरी देऊ शकत नसल्याने भविष्यामध्ये कौशल्यावर आधारित रोजगारांवर लक्ष केंद्रित करावे लागेल, असेही ते म्हणाले.
‘ताज हॉटेल रिसॉर्ट्स अँड पॅलेसेस’च्या सहकार्याने लोणावळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) साकारण्यात आलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स हॉस्पिटॅलिटी वसतिगृह, नवीन प्रशासकीय इमारत आणि कार्यशाळा या वास्तूंचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. पर्यटनमंत्री छगन भुजबळ, आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे, मुख्य सचिव जयंतकुमार बांठीया, ताज हॉटेल्सचे व्यवस्थापकीय संचालक रेमंड बिक्सन, टाटा सन्सचे संचालक आर. के. कृष्णकुमार, जिल्हाधिकारी विकास देशमुख, कौशल्य विकास रोजगार आणि स्वयंरोजगार आयुक्त विजयकुमार गौतम, गृह विभागाच्या प्रधान सचिव मेधा गाडगीळ, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण सहसंचालक सी. ए. निनाळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी आर. एस. घुमे आणि लोणावळा आयटीआयचे प्राचार्य डी. के. शिंदे या प्रसंगी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘रोजगार निर्मिती ही सध्याची मोठी समस्या आहे. सरकार मोठय़ा प्रमाणावर नोकरी देऊ शकत नाही. निवृत्त होणाऱ्या पदांवरील नियुक्तीच्या माध्यमातून सरकारमध्ये केवळ तीन टक्के नव्या नोक ऱ्या उपलब्ध होतात. राज्य सरकार दरवर्षी ३५ हजार कोटी रुपये शिक्षणावर खर्च करते. यामध्ये होणारी गळती आणि शिक्षणातून मिळणारे कौशल्य किती, हा प्रश्न आहे. अभियांत्रिकी पदवी संपादन करणाऱ्यांपैकी केवळ २० टक्के मुले नोकरीच्या लायक असतात, असे उद्योग समूहांचे मत आहे. त्यामुळे कौशल्ये आत्मसात करून देणारे ‘स्किल मिशन’ राबविण्यासाठी टाटा उद्योगाने पुढाकार घेतला असून दरवर्षी पाच हजार मुलांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आयटीआय असावे हा प्रयत्न असून ४१६ आयटीआय कार्यरत आहेत. या इमारतींचा तीन शिफ्टमध्ये वापर केला जात असून कौशल्य विकसित करण्यामध्ये प्रचंड संख्यात्मक उद्दिष्ट गाठावयाचे आहे. सध्या लोकांची क्रयशक्ती वाढली आहे. मॉल संस्कृती वाढली अशी टीका करण्यापेक्षा ग्राहकांना चांगली सेवा देणारी, आत्मविश्वास असलेली मुले घडवायची आहेत. सेवा क्षेत्राला महत्त्व आले असून हॉस्पिटॅलिटी, टूर प्लॅनिंग, पंचतारांकित हॉटेल्स यामध्ये उत्तम सेवा देणाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. छगन भुजबळ, विजयकुमार गौतम यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intention of ultra modern iti with the coop of industry in midc cm
Show comments