लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदवण्यासाठी ऑनलाइन अर्ज ११ मार्चपर्यंत करता येणार आहे.

परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. परीक्षा परिषदेतर्फे ९ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पाचवीच्या ५ लाख ४६ हजार ८७४ विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या ३ लाख ६५ हजार ८५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या http://www.mscepune.in, https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंतरिम सूचीवरील आक्षेप केवळ ऑनलाइन पद्धतीनेच दाखल करायचे आहेत. त्यासाठीचा ऑनलाइन अर्ज पालकांसाठी संकेतस्थळावर, शाळांसाठी शाळा लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. ११ मार्चपर्यंत दाखल झालेले अर्जच ग्राह्य धरले जातील. या अर्जांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अर्जातील माहितीत आणि शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्मतारीख, जात प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम, शाळेचे क्षेत्र या संदर्भातील दुरुस्ती करण्यासाठी ११ मार्चपर्यंत शाळांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आल्याचेही राठोड यांनी नमूद केले.

Story img Loader