दोन वेळच्या आक्षेपांनंतर महापालिका हेरिटेज समितीची अचानक मान्यता
शताब्दी वर्षांत पदार्पण केलेल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमधील मुद्रणालयाची इमारत या वारसा (हेरिटेज) वास्तूमध्ये विनापरवाना अंतर्गत बदल करण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे या विनापरवाना बांधकामाबाबत महापालिकेच्या वारसा व्यवस्थापन विभागाने (हेरिटेज सेल) दोनदा गंभीर आक्षेप घेतले होते. मात्र, वास्तुविशारदाने केलेल्या खुलाशानंतर अचानक महापालिका प्रशासनाचे समाधान झाले आणि त्यामुळे विनापरवाना करण्यात आलेल्या बांधकामाला पश्चात मान्यता मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
भांडारकर संस्थेच्या आवारातील संस्थेचे कार्यालय, मुद्रणालय आणि निझाम वसतिगृह (गेस्ट हाऊस) या तीन वास्तू हेरिटेज म्हणून महापालिकेने जाहीर केल्या आहेत. या वास्तूंची दुरुस्ती आणि डागडुजी करण्यासाठी हेरिटेज सेलची परवानगी घ्यावी लागते. अशा स्वरूपाची परवानगी न घेताच संस्थेने १९३३ मध्ये बांधलेल्या मुद्रणालयाच्या वास्तूमध्ये अंतर्गत बदल करण्यास सुरूवात केली. मुद्रणालयाच्या वास्तूचे संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यासंदर्भात संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर झाला असून दुरुस्तीसाठी हेरिटेज समितीच्या निकषांचे पालन करण्यात येत असून महापालिकेची परवानगी घेतली असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले होते. मात्र, दुरुस्तीच्या नावाखाली जे अंतर्गत बदलाचे काम झाले होते त्याची पाहणी करून हेरिटेज समितीने महाराष्ट्र महापालिका अधिनियम २६०(१) अन्वये संस्थेला नोटीस बजावली होती. हेरिटेज इमारतीलगत आरसीसी खड्डे घेण्याबाबत समितीकडे तक्रारी आल्या असून काम सुरू झाल्यानंतर वेळच्या वेळी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, पहिल्या नोटिशीला उत्तर दिले गेले नसल्याची माहिती पुढे आली आहे.
हेरिटेज समितीचे सदस्य बाळ कुलकर्णी, शर्विय धोंगडे आणि वास्तुविशारद वैशाली लाटकर यांनी ९ मे रोजी संस्थेला भेट देत मुद्रणालय वास्तूची प्रत्यक्ष पाहणी केली. त्या वेळी इमारतीच्या कामाला दिलेली परवानगी आणि प्रत्यक्षात सुरू असलेले काम यामध्ये सुसंगती नाही. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून केलेल्या कामाचा संबंधित वास्तुविशारदाकडून मुद्देनिहाय खुलासा मागविण्यात यावा, असा निर्णय त्या वेळी घेण्यात आला होता. मुद्रणालयाच्या वास्तूमध्ये मोठय़ा प्रमाणावर फेरबदल केले असून ते हेरिटेज समितीने दिलेल्या परवानगीनुसार नसल्याचा ठपका २६ मे रोजी पाठविलेल्या पत्रात ठेवण्यात आला होता. योग्य ती कार्यपद्धती न पाळता समितीला गृहीत धरून कामे केली जात असून निविदा प्रक्रिया, हेरिटेज समितीची कार्यप्रणाली आणि महापालिका नियमावली यांचे पालन केल्याचे दिसून येत नाही, असेही या पत्रात नमूद केले होते.
मात्र, तिसऱ्या बैठकीमध्ये मुद्रणालय वास्तूमध्ये सभागृहाचे नियोजन केले जात असून त्याचे थ्री-डी सादरीकरण वास्तुविशारदांतर्फे करण्यात आले. ही प्रथितयश संस्था असून कोणत्याही हेरिटेज मिळकतीमध्ये उत्पन्नाच्यादृष्टीने काही फेरबदल केल्यास त्या उत्पन्नातून वास्तू जतन होण्यास मदत होत असल्याने सकारात्मक विचार करावयास हरकत नाही. मात्र, कोणतीही मान्यता न घेता फेरबदलाची कामे परस्पर केली जाणार नाहीत याबाबत दक्षता घेणे जरूरीचे आहे, अशा अटीवर या फेरबदलास मान्यता देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेरिटेज वास्तूतील अंतर्गत बदल हे महापालिकेची रीतसर परवानगी घेऊनच करण्यात येत आहेत. हेरिटेज वास्तूला ओरखडाही आलेला नाही, या वास्तूमध्ये शंभर आसनक्षमतेचे प्रेक्षागृह उभारण्यात येणार असून त्याच्या आराखडय़ाला सात वर्षांपूर्वीच मंजुरी मिळालेली आहे. मुद्रणालयाच्या भिंतीत तीन झाडे उगवली आहेत. ती काढून टाकण्यासाठी वनविभागाने परवानगी दिली आहे. मात्र, ती काढल्यास भिंत कोसळेल.
-राहुल सोलापूरकर, भांडारकर संस्थेचे विश्वस्त

हेरिटेज वास्तूतील अंतर्गत बदल हे महापालिकेची रीतसर परवानगी घेऊनच करण्यात येत आहेत. हेरिटेज वास्तूला ओरखडाही आलेला नाही, या वास्तूमध्ये शंभर आसनक्षमतेचे प्रेक्षागृह उभारण्यात येणार असून त्याच्या आराखडय़ाला सात वर्षांपूर्वीच मंजुरी मिळालेली आहे. मुद्रणालयाच्या भिंतीत तीन झाडे उगवली आहेत. ती काढून टाकण्यासाठी वनविभागाने परवानगी दिली आहे. मात्र, ती काढल्यास भिंत कोसळेल.
-राहुल सोलापूरकर, भांडारकर संस्थेचे विश्वस्त