भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना तत्काळ बदला आणि त्यांच्या जागी सिद्धार्थ शिरोळे यांची नियुक्ती करा अन्यथा आगामी महापालिका निवडणूक भाजपसाठी अडचणीची ठरेल, अशी मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी केल्यानंतर त्याला शहर भाजपच्या वतीने उत्तर देण्यात आले आहे.
हेही वाचा >>>पुणे:‘बीआरटी’ला आमदारांचा विरोध; राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागणीला भाजप आमदाराचा पाठिंबा
भाजपकडे निवडणूक तज्ज्ञ आहेत. केसकर यांच्यासारख्या स्वयंघोषित नेता आणि निवडणूक विश्लेषकाची पक्षाला गरज नाही. उज्ज्वल केसकर भारतीय जनता पक्षात आहेत की नाही हाच प्रश्न आहे, अशा शब्दात शहर उपाध्यक्ष, प्रवक्ता धनंजय जाधव यांनी त्यांना सुनावले आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
हेही वाचा >>>सिंहगड महाविद्यालय परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडांना पोलिसांचा चोप ; पोलिस कारवाईचे कौतुक
भाजपमध्ये गटबाजी नाही; पण काही अल्पसंतुष्ट लोक गटबाजी असल्याचे भासवत आहेत. पक्षाकडे अनेक निवडणूक तज्ज्ञ आहेत. केसकर यांच्यासारख्या स्वयंघोषित नेत्याची आणि निवडणूक विश्लेषकाची गरज नाही. करोना संकट काळात जगदीश मुळीक त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने चांगले काम केले. मुळीक यांना हटविण्याची मागणी केसकर यांनी केली असली तरी पुन्हा त्यांनाच शहराध्यक्षपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे, असे धनंजय जाधव यांनी म्हटले आहे.