जलसंपदा विभागाकडून सादरीकरण; दुरुस्तीसाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम केंद्र शासनाच्या केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र (सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन -सीडब्लू अ‍ॅन्ड पीआरएस) या संस्थेच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली सुरू असून या धरणाच्या दुरुस्तीसाठी आणखी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. दरम्यान, टेमघरच्या दुरुस्तीसाठी खासगी आंतरराष्ट्रीय कंपनीची मदत घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी जलसंपदा विभागाकडून केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र आणि केंद्रीय जल आयोगाकडे सादरीकरण करण्यात येणार आहे. या संस्थांनी मंजुरी दिल्यास नव्या तंत्रज्ञानानुसार धरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

सद्य:स्थितीत टेमघर धरणात १.१४ अब्ज घनफुट (टीएमसी) म्हणजे ३०.६८ टक्के एवढा पाणीसाठा असून हे पाणी पुणे शहर आणि सिंचनासाठी खडकवासला धरणातून सोडण्यात येणार आहे. सध्या खडकवासला धरणात तीनशे क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. डिसेंबरपासून पुन्हा धरणाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून टेमघर धरणाची गळती थांबविण्याचे आणि धरणाच्या सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे धरणातून होणारी पाण्याची मोठी गळती थांबली आहे. परंतु, धरण पूर्णपणे सक्षम करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.

दरम्यान, धरणे आणि त्यामधील गळती याबाबत दिल्ली येथे नुकतीच एक बैठक पार पडली. बैठकीत तामीळनाडू येथील कदम पराई या धरणाची गळती रोखण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरण्यात आले, त्याबाबत चर्चा करण्यात आली. हेच तंत्रज्ञान टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी वापरल्यास त्याचा फायदा होईल, असे मत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

या पाश्र्वभूमीवर नव्या तंत्रज्ञानाबाबत माहिती घेऊन त्याबाबतचे सादरीकरण केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र आणि केंद्रीय जल आयोगाकडे करण्यात येणार असून त्यांनी मंजुरी दिल्यास काम सुरू करण्यात येणार आहे. टेमघर धरण रिकामे करून धरणाच्या भेगांमध्ये सिमेंट भरण्याचे काम केले जाणार आहे. तसेच शॉर्ट क्रीट (सिमेंटचे प्लास्टर) करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली.

नवे तंत्रज्ञान काय?

जिओ मेंबरिंग नावाचे हे तंत्रज्ञान आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्पी ग्लोबल कॅपिटल कंपनीचे हे तंत्रज्ञान असून या तंत्रात पीयूसी पेपरसारख्या प्लास्टिक पेपर बनविण्यात येतो. धरणाच्या ज्या बाजूने गळती आहे, त्याच्या उर्ध्व बाजूने हा पेपर लावण्यात येतो. त्यानंतर त्यावर स्टील प्लेट लावून नटबोल्टद्वारे त्या कायमस्वरूपी जोडल्या जातात. ही आधुनिक पद्धत असून कंपनीकडून कामाची दहा वर्षांची हमी, तर पंधरा वर्षांची वॉरंटी मिळणार आहे. तामीळनाडूमधील कदम पराई या धरणाची गळती या तंत्रज्ञानाने रोखण्यात यश आले आहे.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International company help for repair work of the temghar dam
Show comments