‘सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ म्युझिक अॅण्ड कल्चर अमंगस्ट युथ’ (स्पिक मॅके) या संस्थेतर्फे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पहिले शास्त्रीय संगीताचे आंतरराष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन २० ते २६ मे या कालावधीत कोलकत्यातील आयआयएम-सीमध्ये होणार आहे.
भारतीय संस्कृती तरुणांपर्यंत पोहचावी या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनामध्ये गिरिजा देवी, प्रा. टी. एन. कृष्णन, पंडित बिरजु महाराज, विद्वान टी. व्ही. शंकरनारायणन, पंडित शिवकुमार शर्मा यांसारखे अनेक रथी-महारथी आपली कला सादर करणार आहेत. तसेच विविध कार्यशाळा, संगीत मैफलींचाही समावेश असणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना ‘आश्रम जीवन’ जगण्याची संधी मिळणार आहे. संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते होणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ प्रवासाचा खर्च करावा लागणार आहे. इतर राहण्याचा, जेवणाचा खर्च संस्था करणार आहे. संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी http://www.spicmacay.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.