कृष्णा पांचाळ, प्रतिनिधी
धावत पळत आपल्या आई-बाबांच्या कुशीत जाणाऱ्या ओंकारला ट्रक अपघातात एक पाय गमवावा लागला. नेहमी स्मित हास्य आणि अत्यंत हुशार असलेला ओंकार आज एका पायावर चालतो आहे. तो कधी कुबड्यांचा आधार घेईल असं त्याच्या आई वडिलांना वाटलं नव्हतं. काही वर्षांपूर्वी ओंकार चुलत भावासह रस्त्याच्या कडेला खेळत होता. तेव्हा, मद्यधुंद असलेल्या ट्रक चालकाने पाठीमागे ट्रक मागे घेतला आणि यातच ओंकारचा पाय गेला, तर चुलत भावाचा मृत्यू झाला. आजही तो दिवस आठवला तरी आई वडिलांच्या डोळ्याच्या कडा पाणावतात.
International Disability Day 2019 : आज जागतिक दिव्यांग दिवस असून ओंकारसारख्या मुलांना दिव्यांग म्हणणे कितपत योग्य आहे की अयोग्य हे ठाऊक नाही. सध्या तरी तो आहे त्या जगण्यात आनंदी आहे. रामदास लकडे आणि मंगल लकडे यांना दोन मुले आहेत. त्यापैकी ओंकार हा लहान मुलगा. तो छोटा असल्यापासून आई वडिलांचा खूप लाडका होता. परंतु, एका घटनेने आठ वर्षाच्या ओंकारचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. आई मंगल, चुलत भाऊ आणि ओंकार त्या दिवशी कामानिमित्त जात होते. तेव्हा ओंकार आणि त्याचा चुलत भाऊ हे दोघे खेळत रस्त्याच्या कडेला बसले होते. समोर ट्रक होता. परंतु, काही अघटित घडेल अस दोघांनाही वाटले नसेल.
खेळण्यात दंग असताना अचानक मद्यधुंद ट्रक चालकाने ट्रक मागे घेतला. ओंकार आणि त्याच्या भावाला काही समजण्याच्या आत अपघात झाला. तेव्हा ओंकार चार वर्षांचा होता. ओंकारच्या पायाला गंभीर जखम झाली तर चुलत भाऊ हा घटनेत गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान चुलत भावाचा मृत्यू झाला. ओंकारचा पाय कायमचा शरीरापासून काढून टाकावा लागला. ही घटना अगदी सुन्न करणारी होती. आई काही फुटांवर बसली होती. परंतु त्या माऊलीला आपल्या मुलावर असा वाईट प्रसंग ओढावेल असं क्वचितही वाटलं नसेल.
आणखी वाचा – दिव्यांग दिवस : दिव्यांगाची खडतर वाट सुसह्य व्हावी म्हणून ‘त्यांनी’ सुरू केली शाळा
ही सर्व घटना सांगत असताना ओंकार चे वडील रामदास लकडे यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते. त्यांचा आवाज सर्व काही बोलून जात होता. ओंकार बद्दलचं प्रेम व्यक्त होत होते. आज ही त्यांचा या घटनेवर विश्वास बसत नाही अशी भावना ते व्यक्त करता. संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल झालेला असून त्याला शिक्षा व्हावी अशी रामदास यांचं म्हणणे आहे.