वेगवेगळ्या हस्तकला, कपडे यांच्या प्रदर्शनांमध्ये खरेदीचा आनंद लुटण्याबरोबरच आता आपल्या घरातल्या पाळीव प्राण्यांसाठी वेगवेगळ्या ब्रँडेड वस्तू एका छताखाली पाहता येणार आहेत. त्यात पाळीव प्राण्यांसाठीची उत्पादने, सेवा या गोष्टी प्रदर्शित केल्या जाणार आहेत… विशेष म्हणजे हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन असून, त्यासाठी पुण्याची झालेली निवड ही येथे फोफावलेल्या ‘पेट इंडस्ट्री’ चा पुरावाच मानला जात आहे. त्याद्वारे येथील ग्राहकांना आकर्षित केले जाणार आहे.
जानेवारी-फेब्रुवारी हे महिने प्रदर्शनांचे आणि खरेदीचे! वेगवेगळ्या ब्रँड्सचे डिस्काउंट सेल्स, विविध प्रदेशांच्या वैशिष्टय़पूर्ण हस्तकलांची प्रदर्शने सध्या सगळीकडे दिसत आहेत. त्यातच आता घरातल्या ‘मोत्या-मनी’ साठीच्या वस्तूंचे प्रदर्शनही होणार आहे. आंतरराष्ट्रीय पेट ट्रेड फेअर यावर्षी पुण्यात होणार आहे. पेट ट्रेड फेअरने पुण्यात फोफावणाऱ्या ‘पेट इंडस्ट्री’ने पाळीव प्राण्यांसाठी खाणे आणि विविध उत्पादनांची निमिर्ती करणाऱ्या कंपन्यांना आकर्षित केले आहे. १७ ते १९ जानेवारी या दरम्यान मगरपट्टा येथील लक्ष्मी लॉन्स येथे हे प्रदर्शन भरणार आहे.
या प्रदर्शनामध्ये मासे, पक्षी, कुत्री, मांजर, हॅमस्टर्स, उंदीर, घोडे या सगळ्या प्राण्यांसाठीची विविध उत्पादने या प्रदर्शनामध्ये आहेत. सध्या घराच्या किंवा हॉटेल्स, ऑफिसेस यांच्या सजावटीमध्ये सध्या ‘अॅक्व्ॉरियम’चे महत्त्वाचे स्थान आहे. त्या अनुषंगाने अॅक्व्ॉरियम्ससाठी स्वतंत्र कक्ष आहे. प्रदर्शनाच्या कालावधीमध्ये, कोणता प्राणी पाळावा याबाबतचे समुपदेशन, डॉग शोज, कॅट शोज होणार आहेत. ‘सुदृढ प्राणी’, ‘आज्ञाधारक प्राणी’ अशा स्पर्धाही या दरम्यान होणार आहेत. या प्रदर्शनामध्ये पाळीव प्राण्यांचे खाणे, औषधे आणि विविध उत्पादनांचे आणि सेवांचे शंभरहून अधिक ब्रँड्स आहेत. प्रामुख्याने अमेरिका, सिंगापूर, इटली, रशिया, चीन, कोरिया, ऑस्ट्रेलिया या देशांमधील कंपन्या या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्या आहेत. साधारण दहा हजार लोक या प्रदर्शनाला भेट देतील असा अंदाज आयोजकांकडून व्यक्त केला जात आहे.
पुणेच का?
‘‘पुण्यामध्ये ‘पेट इंडस्ट्री’ची मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्य, सेवा, प्रशिक्षण अशा विविध सेवांची  उलाढाल गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात वाढली आहे. पेट इंडस्ट्रीच्या उलाढालीमध्ये पुणे महाराष्ट्रात आघाडीवर आहेच, पण देशातही पुण्याचे स्थान महत्त्वाचे आहे. पुण्यामध्ये आयटी क्षेत्र विस्तारल्यानंतर लोकांकडे पैसा आला आहे, त्याचबरोबर सोबत म्हणून पाळीव प्राणी पाळण्याकडे कल वाढला आहे. या पाश्र्वभूमीवर पुण्यात होणाऱ्या ‘इंटरनॅशनल पेट ट्रेड फेअर’ मुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रँड्सची ग्राहकांना ओळख होणार आहे, तर उत्पादकांनाही मोठी बाजारपेठ मिळू शकेल.’’
– दिया चौधरी, माध्यम समन्वयक, पेट ट्रेड फेअर
  प्रदर्शनामध्ये नेमके काय?

  • – विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ब्रँड्सची उत्पादने
  • – पाळीव प्राण्यांच्या मालकांसाठी कार्यशाळा
  • – पाळीव प्राण्यांसाठी सेवा पुरवणाऱ्यांसाठी चर्चासत्रे आणि कार्यशाळा
  • – पशुवैद्यांची चर्चासत्रे
  • – पाळीव प्राणी आणि मालकांसाठी विविध खेळ आणि स्पर्धा
  • – प्राण्यांचे प्रशिक्षण, काळजी याची प्रात्यक्षिके
  • – स्वयंसेवी संस्थांच्या कामाची ओळख

 

Story img Loader