‘डीप जिनोम प्रोजेक्ट’ या आंतरराष्ट्रीय प्रकल्पात ‘आयसर पुणे’चा सहभाग

पुणे : उंदीर आणि माणूस यांच्यातील जनुकीय साम्यामुळे गुंतागुंतीच्या रोगांवर औषधे शोधण्यासाठी उंदरांच्या जनुकांचा अभ्यास ‘डीप जिनोम प्रोजेक्ट’ अंतर्गत केला जाणार आहे. जगभरात या प्रकल्पाची वीस संशोधन केंद्रे असून भारतातील एकमेव केंद्र पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) आहे.

जिनोम बायॉलॉजी या नियतकालिकात प्रकाशित संशोधन निबंधात मर्यादित जनुकीय ज्ञानामुळे वैद्यक क्षेत्रास येत असलेल्या मर्यादांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. एकूण पंधरा देशांतील ४४ वैज्ञानिक, डॉक्टर, शिक्षणतज्ज्ञ यांनी हा शोधनिबंध लिहिला असून त्यात मानवी जनुकीय आराखडय़ाच्या सखोल अभ्यासाची गरज व्यक्त करण्यात आली. डीप जिनोम प्रकल्पात आयसरतर्फे सहभागी असलेले डॉ. संजीव गलांडे यांनी या संदर्भात माहिती दिली.

‘उंदराच्या जनुकीय आराखडय़ाचा वापर करण्याकरिता दी इंटरनॅशनल माउस फेनोटायपिंग कॉन्सोर्टियम (आयएमपीसी) ची स्थापना करण्यात आली आहे. उंदरांच्या जनुकांमध्ये बदल करून त्यांच्यात दिसणारे शारीरिक आणि रासायनिक बदल तपासण्याचा हा प्रकल्प आहे. २०२१ पर्यंत उंदरांतील नऊ हजार जनुकांच्या माहितीचे विश्लेषण केले जाणार असून तो उंदराच्या जनुकीय आराखडय़ाच्या निम्मा भाग असणार आहे. यातून जनुकांचा रोगांशी असलेला संबंध स्पष्ट होणार आहे,’ असे डॉ. गलांडे यांनी सांगितले.

जनुकीय आजार शोधून काढणे हे या प्रकल्पामुळे सोपे होऊ शकेल. एखादा रोग जनुकीय असतो याचा अर्थ त्याच्याशी संबंधित जनुकांमध्ये उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेले असते. ते नेमक्या कुठल्या जनुकात घडून आले आहे हे समजल्यानंतर त्यावर जनुकीय उपचार शोधता येतात. पण आतापर्यंत पुरेसा अभ्यास न झालेली काही जनुके आहेत. त्यामुळे या जनुकांशी संबंधित मानवी रोगांची पुरेशी माहिती नाही. माणसाचा जनुकीय आराखडा व उंदरांचा आराखडा यात ९७ टक्के साम्य आहे. त्यामुळे उंदरांवर जनुकीय संपादनाचे प्रयोग करून जनुकांचे कार्य, त्यांचा रोगाशी असलेल्या संबंधाचा उलगडा करता येऊ शकेल. उंदरासारख्या सस्तन प्राण्यांच्या जनुकीय आराखडय़ातील जनुकांची सूची तयार करण्यात येणार असून त्यात जनुक, त्याचे कार्य व शारीरिक परिणाम यांचा अभ्यास केला जाईल. त्यामुळे आतापर्यंत पुरेसा अभ्यास न झालेल्या जनुकांच्या कार्यावर प्रकाश पडेल, असे डॉ. गलांडे यांनी सांगितले.

तीन टप्प्यांचा प्रकल्प

एकूण तीन टप्प्यांच्या प्रकल्पात सुरुवातीला उंदराच्या जनुकीय आराखडय़ातील ३ ते ५ टक्के प्रथिननिर्मिती करणाऱ्या जनुकांचा अभ्यास करून या प्रथिनांचे काम थांबल्यास काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात जनुकीय आराखडय़ातील संकेतावलीच्या बाहेरील जनुकांचा अभ्यास केला जाईल. संकेतावली बाहेरच्या जनुकांचे कार्य आतापर्यंत प्रकाशात आलेले नाही. पण ही जनुके फार महत्त्वाचे काम करीत असतात. तिसऱ्या टप्प्यात जनुकीय माहिती व ज्ञानाचे रूपांतर वैद्यकीय ज्ञानात केले जाणार असल्याने वैज्ञानिक, संशोधक त्याचा वापर करून उपचार पद्धती विकसित करू शकतील.