पुण्यातील अनेक संस्थांनी रविवारी आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहाने साजरा केला. पुण्यातील योग प्रशिक्षण केंद्र, विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्याकडून आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्यातील मोठी मैदाने, बागा, सभागृहे पहाटेपासूनच गजबजली होती. योग साधना केंद्र, विविध सामाजिक संस्थांनी योगदिनाचे आयोजन केले होते. सामूहिक सूर्यनमस्कार, योगासने, योगासनांची प्रात्यक्षिके, योगाचे महत्त्व सांगणारी व्याख्याने यांचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित करण्यात योग प्रात्यक्षिकांच्या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीत झाले. पालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे येरवडा येथील शाळेत आयोजित कार्यक्रमात खाशाबा जाधव क्रीडानिकेतनमधील विद्यार्थ्यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनीही योगाचे धडे घेतले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा आणि महाविद्यालयांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सिम्बायोसिस विद्यापीठाच्या योगा केंद्राचे उद्घाटन योगादिनाचे औचित्य साधून करण्यात आले. एमआयटी, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटियन एज्युकेशन सोसायटी, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, भारती विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सुधाकर जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट, अभिनव एज्युकेशन सोसायटी, आबासाहेब गरवारे महाविद्यालय या शिक्षण संस्थांमध्ये योगदिन साजरा करण्यात आला.
याशिवाय वझे तालीम, ओंकार योग साधना केंद्र, जहांगिर रूग्णालय, विविध हास्यक्लब यांनीही योग दिवस साजरा केला. अष्टांग योग परिवारातर्फे परिवाराचे अध्यक्ष प्रसन्न पाटील आणि नवचैतन्य हास्य योग परिवाराचे अध्यक्ष विठ्ठल काटे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुमारे एक हजार नागरिकांनी डॉ. नितिन उनकुले यांच्यासह योग प्रात्यक्षिके केली.

शाळा उदासीन, पावसामुळेही निराशा
शहरातील शाळा मात्र योगदिन साजरा करण्याबाबत काहीशा उदासीन होत्या, तर काही शिक्षणसंस्थांनी कार्यक्रमांचे आयोजन करूनही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद यथातथाच होता. त्यामुळे शिक्षक आणि कर्मचारीच बहुतेक महाविद्यालयांमध्ये दिसत होते. काही शाळांनी योग साधना केंद्रांच्या कार्यक्रमांमध्ये निवडक विद्यार्थी पाठवले होते. मात्र, अनेक शाळा सकाळी बंदच होत्या. काही शाळांनी शनिवारीच निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करून रविवारी सुटीच घेतली. शहरातील अनेक भागांमध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे मोकळ्या मैदानांवर कार्यक्रम करणाऱ्या अनेक संस्थांचा विरसही झाला.

नवी बाजारपेठही
योगादिनाच्या निमित्ताने काही संस्थांनी आपल्या वस्तूंची विक्रीही चालवली होती. योग दिनाच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी संस्थांचे स्वयंसेवक हे टी-शर्ट, योगा मॅट, बिल्ले यांची विक्री करताना दिसत होते. विविध संकेतस्थळांनीही योगदिनानिमित्त ग्राहकांसाठी विविध योजना जाहीर केल्या होत्या.

Story img Loader