‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ या गीतासाठी केलेला ‘भूप’ रागाचा वापर.. ‘दशरथा घे हे पायसदान’ या गीतामध्ये ‘दशरथा’ म्हणताना समेवर कसे यायचे.. ‘सावळा गं रामचंद्र’ या गीताला दिलेली ओवीची चाल.. ‘आकाशाशी जडले नाते’ गीत गाताना आकाशाशी नाते स्वरांतून कसे जोडले गेले.. ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा’ या गीतामध्ये ‘ज्येष्ठ’ या शब्दावर केलेला आघात.. अशा अभ्यासपूर्ण रसग्रहणातून ‘गीतरामायणा’चे वेगवेगळे पैलू प्रसिद्ध संगीतकार-गायक श्रीधर फडके यांनी उलगडले आणि ‘पुत्र सांगती चरित पित्याचे’ या गीतरामायणातील काव्यपंक्तीची प्रचिती रसिकांना आली. मला आणखी किती आयुष्य आहे, त्यामुळे नवोदित गायकांनी गीतरामायणाचे शिवधनुष्य जरूर पेलावे. पण, ‘अभ्यासोनि प्रकटावे’ अशा पद्धतीने ही गाणी सादर करावीत, अशी अपेक्षाही श्रीधर फडके यांनी बोलून दाखविली.
महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायण’ च्या हीरकमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून भारतीय शिक्षण मंडळ संस्थेने श्रीधर फडके यांच्या मुलाखतीचे आयोजन केले होते. ‘सुधीर फडके यांचे संगीत’ या विषयावर पीएच. डी. केलेल्या भाग्यश्री मुळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
नूमवि प्रशालेच्या प्रांगणात १९७१ मध्ये बाबुजींनी पहिल्यांदा गीतरामायण सादर केले. गीतरामायणाचा आवाका किती मोठा आहे हे तेव्हाच मला कळाले, ‘प्रभो मज एकच वर द्यावा’ हे गाणे त्यांनी मला शिकविले होते. पण, बाबुजी असेपर्यंत गीतरामायण सादर करण्याची िहमत झाली नाही. २००५ मध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षांत मी गीतरामायण सादर करायला प्रारंभ केला. गीतरामायणाची गीते आईला (ललिता फडके) ऐकवून मला जमते की नाही हे जाणून घेतले, या आठवणींना उजाळा देत श्रीधर फडके म्हणाले,‘‘ बाबुजी आणि गदिमा हे अद्वैत होते. हृदयाचा ठाव घेणाऱ्या ५६ गीतांतून गदिमांनी प्रभू रामचंद्रावर चित्रपटच केला आहे. दोघांनाही चित्रपट माध्यमाचे ज्ञान असल्यामुळे कॅमेरा फिरावा तसे गीत फिरत रहाते. काव्यात जे सांगितले ते बाबुजींच्या स्वरांतून उमटायचे. त्यामुळे गीतरामायणाचे काव्य श्रेष्ठ की संगीत या प्रश्नामध्ये पडू नये. काव्य आणि संगीत दोन्ही तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक गीताचा मुखडा किंवा ध्रुवपद हेच गीतरामायणाचे बलस्थान आहे.’’
‘‘नव्या पिढीतील कलाकारांनी गीतरामायण जरूर गावे. पण, गायचे तर किमान १२ ते १४ गीते सादर करावीत;  त्याचे पावित्र्य राखले जाईल. कोणत्याही कार्यक्रमात गीतरामायणातील गीत गायल्यानंतर लावणी सादर करायची हा त्या कलाकृतीवरच अन्याय आहे. गीतरामायणावर अनेक जण उत्तम नृत्य सादर करतात. पण, नृत्यापेक्षाही बाबुजींच्या गायनातूनच आपल्या डोळ्यासमोर दृश्य उभे राहते, असे माझे प्रामणिक मत असल्याचे श्रीधर फडके यांनी सांगितले. प्रा. ए. पी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. संतोष पोतदार यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा