जागतिक आरोग्य दिन नुकताच साजरा झाला. धकाधकीच्या जीवनशैलीत प्रकृती निरोगी राखण्याकडे प्रत्येकाचाच कल आहे. कसा साधायचा हा समतोल? सांगताहेत व्यायाम, आहार आणि योग या विषयी मार्गदर्शन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगपदकविजेत्या आणि राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या योगतज्ज्ञ मनाली देव. त्यांच्याशी ज्ञानेश भुरे यांनी साधलेला हा संवाद…
सुदृढ, निरोगी आरोग्याची नेमकी व्याख्या काय?
– तुम्ही शारीरिक, मानसिकदृष्ट्या किती सक्षम आहात, यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. या दोन्ही आघाड्यांवर तुम्ही संतुलन राखलेत, तर तुमचे आरोग्य उत्तम राहते. धकाधकीच्या जीवनशैलीत आपण शरीररचनेकडे दुर्लक्ष करत असतो. निरोगी आरोग्य आणि शरीरसंपदा राखण्यासाठी प्रामुख्याने शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. तुम्ही जेव्हा मानसिकरीत्या संतुलित असता, तेव्हा तुमचे शरीर योग्य काम करते. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. मन स्वस्थ असेल, तर तुम्ही ताजेतवाने राहता आणि त्यामुळे शरीराच्या हालचालीदेखील योग्य होतात.
शारीरिक तंदुरुस्ती म्हणजे नेमके काय?
– आपल्या वयानुसार शारीरिक क्षमता आणि सहन करण्याची ताकद बदलत असते. लहानपणी वा तरुणपणी आपण ज्या ऊर्जेने काम करतो, तसे आपण वय वाढू लागले, की करत नाही. विशेषतः चाळिशीपासून ऋतू किंवा हवामानात बदल झाला, की आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरू होतात. यासाठी योग्य झोप, लवकर उठणे, व्यायाम, पूरक आणि नैसर्गिक आहार आवश्यक आहे. दिनचर्येचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
यात मानसिक तंदुरुस्तीचे महत्त्व किती आहे?
– शारीरिक तंदुरुस्तीइतकीच मानसिक तंदुरुस्तीदेखील महत्त्वाची आहे. यासाठी सकारात्मक विचार आणि दृष्टिकोनाची गरज आहे. तुमचे मानसिक संतुलन नसेल, तर त्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. रोजच्या जीवनात प्रत्येक पावलावर तुम्हाला ताणतणावाचा सामना करावा लागतो. तुम्ही जेवढे मानसिकदृष्ट्या कणखर असता, तेवढी तुमची प्रतिकारशक्ती वाढते. मन प्रसन्न असेल, तर निम्मे काम हलके होते.
उत्तम आरोग्यासाठी योगासने किती फायदेशीर?
– योगासनांचा फायदा होतो, असे म्हणण्यापेक्षा तो करून घेता येतो. योग्य मार्गदर्शन घेतले, तर योगासने करणे कठीण नाही. सकाळी उठून ध्यानधारणा करण्यापासून याची सुरुवात होते. पाच मिनिटे डोळे मिटून शांत बसलात, तरी तुमचे मन स्थिर होण्यास मदत होते. पुढचा भाग प्राणायाम आणि योगासने. योग्य प्रशिक्षण घेतले, की तुम्हाला घरच्या घरीदेखील प्राणायाम आणि योगासने करता येऊ शकतात. मनाला आणि शरीराला आराम मिळण्याची ताकद योगासनांमध्ये आहे. अलीकडे तर विविध शारीरिक व्याधींवर योगासनांद्वारे उपचार केले जाऊ लागले आहेत.
आहार कसा असायला हवा?
– आहार सात्त्विक असायला हवा. पोळी/भाकरी, भाजी, भात, वरण असे घरगुती जेवण हा सगळ्यांत उत्तम आहार मानला जातो. याचा अर्थ मसालेदार आणि मासांहार करू नये, असे नाही. पण, ते प्रमाणात हवे. फलाहार, सुकामेवादेखील उत्तम. जेवणाची वेळदेखील निश्चित असायला हवी. अलीकडे कामाच्या व्यापात अनेक जण जेवणाच्या वेळा पाळत नाहीत. त्यामुळेही शरीरावर परिणाम होतो. आहाराच्या काही तक्रारी असतील, तर आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या. अलीकडे पूरक आहाराकडे (सप्लिमेंट्स) तरुणवर्ग आकर्षित होताना दिसतो. पण, तो सर्वसामान्यांसाठी नसतो हे समजून घ्या. वेटलिफ्टिंग, शरीरसौष्ठव यांसारख्या खेळात कारकीर्द घडविणाऱ्यांसाठी तो आवश्यक असतो. नैसर्गिक म्हणजे घरगुती आहार हा प्रदीर्घ परिणाम देणारा असतो आणि कृत्रिम आहाराचे परिणाम अल्पावधीचे असतात. कृत्रिम आहाराची सवय शरीराला चांगली नाही. त्यामुळेच व्यायामाबरोबर नैसर्गिक आहार निरोगी आयुष्यासाठी आवश्यक आहे.
व्यायाम कसा आणि किती करावा?
– व्यायाम कुठल्याही प्रकारे करा, पण तो करा. चालणे, पळणे, वजन उचलणे, सायकलिंग, जलतरण, झुम्बा असे व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आता प्रचलित होऊ लागले आहेत. फक्त हे करताना योग्य मार्गदर्शन घ्या. सध्या झपाट्याने प्रभाव पाडणाऱ्या रील किंवा समाज माध्यमी सल्ल्यांच्या मागे जाऊ नका. व्यायामामुळे तुमची शारीरिक क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, तुमच्या शरीराला झेपेल असाच व्यायाम निवडा. रोज किमान ३० ते ४० मिनिटे व्यायाम आणि १० मिनिटे विश्रांती असे नियोजन असावे. दहा मिनिटांच्या विश्रांतीत एखादे आसन आणि प्राणायाम करावा. त्यामुळे चांगला आराम मिळतो.
dnyanesh.bhure@expressindia.com