पुणे : राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून निवडणूक आयोगाला दिलेली स्वायत्तता अबाधित राखण्याकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यातील काँग्रेसने आयोजित केलेल्या आंदोलनात पक्षांतर्गत विसंवाद चव्हाट्यावर आला. काँग्रेसचे आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी या आंदोलनाला उपस्थित राहणार नसल्याचे कळवूनही ते येणार असल्याचे स्थानिक नेत्यांनी जाहीर केले. नेत्यांनी ही माहिती दडवून वेठीस धरल्याचे लक्षात येताच पदाधिकारी संतापले. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी पुन्हा उफाळून आली.
निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कृतीविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्धार केला. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार पुण्याची जबाबदारी ही आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यावर सोपविण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे नियोजन शहर काँग्रेसने केले. मात्र, बाहेरगावी असल्याने आंदोलनाच्या ठिकाणी येणार नसल्याचे आमदार पाटील यांनी स्थानिक नेत्यांना कळविले. ही माहिती आमदार पाटील यांच्याकडून प्रदेश कार्यालयालाही कळविण्यात आली होती. मात्र, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ही माहिती दडवून ठेवली. कार्यक्रमाच्या ठिकाणी काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमा झाले. ते आमदार पाटील यांची प्रतीक्षा करत थांबले होते. बराच वेळ झाला, तरी ते कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याची चिन्हे दिसत नसल्याने पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांकडे विचारणा करण्यात येत होती. तेव्हा ‘ते निघाले आहेत, वाटेत आहेत, थोड्याच वेळात पोहोचतील,’ असे स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिष्ठत थांबले.
गर्दी जमल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले आणि आंदोलनाची सांगता झाली. मात्र, आमदार पाटील येणार नसल्याचे माहीत असतानाही स्थानिक नेत्यांनी वेठीस धरल्याचे लक्षात येताच काही कार्यकर्ते संतप्त झाल्याचे एका पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
मोजक्याच पदाधिकाऱ्यांना निरोप?
राज्य पातळीवर आंदोलन करण्यात येणार असताना काही मोजक्याच स्थानिक पदाधिकाऱ्यांना आंदोलनाच्या ठिकाणी येण्याचे निरोप देण्यात आले होते. मात्र, ही बाब लक्षात आल्यावर काहींना ऐनवेळी निरोप देण्यात आले. त्यावरूनही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरविल्याने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली.
या आंदोलनात डॉ. असीम सरोदे, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार दीप्ती चवधरी, माजी शहराध्यक्ष अॅड. अभय छाजेड, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी नगरसेवक रफिक शेख, अविनाश बागवे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, अजित दरेकर, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव आदी सहभागी झाले होते.
आमदार सतेज पाटील येणार होते. ते वाटेत असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार असल्याची माहिती देण्यात येत होती. –अरविंद शिंदे, प्रभारी शहराध्यक्ष
आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील बाहेरगावी असल्याने या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहता येणार नसल्याचे स्थानिक नेत्यांना कळविण्यात आले होते. ही माहिती प्रदेश कार्यालयाला देण्यात आली होती.-दगडू भोसले, आमदार पाटील यांचे स्वीय सहायक