परप्रांतीयांच्या विरोधातील राजकारण आपल्याला मान्य नाही. जो इथे राहतो, तो महाराष्ट्रीय आहे आणि तो आमचा आहे, अशी भूमिका पालकमंत्री गिरीश बापट यांनी भोसरीत बोलताना मांडली. सहकारातील अपप्रवृत्तीमुळेच सहकार क्षेत्राचे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले.दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी आवश्यक मशिनरीचे उत्पादन करणाऱ्या भोसरीतील महालक्ष्मी इंडस्ट्रीजचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. माजी आमदार विलास लांडे, मोहन जोशी, पुणे महापालिकेतील नगरसेवक प्रकाश ढोरे, कंपनीचे संचालक त्रिभुवन्नाथ तिवारी आदी उपस्थित होते.बापट म्हणाले,‘कोण उत्तर प्रदेशचा, बिहारचा, मध्यप्रदेशाचा असा भेदभाव आम्ही करत नाही. महाराष्ट्रात जो निवास करतो, तो महाराष्ट्रीयन आहे. त्याचे घर, शेती, नातेवाईक इतर मुलखात असले म्हणून काय झाले, तो या देशाचा नागरिक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पुण्यात अशी मंडळी मोठय़ा प्रमाणात असून ती येथील वातावरणाशी एकरूप झालेली आहेत. अनेक परप्रांतीय आपल्यापेक्षा अधिक चांगले मराठी बोलताना आढळतात. महाराष्ट्राशी त्यांचे नाते घट्ट झाले आहे. काही चुकीचा पायंडा महाराष्ट्रात होऊ पाहत आहे, ते करणाऱ्यांमध्ये सुधारणा करण्याची, वेळप्रसंगी त्यांना सरळ करण्याची गरज आहे.दुग्ध उत्पादनात भारताची पीछेहाट झाल्याचे सांगत ते म्हणाले, दुधाच्या भेसळीबाबत शासनाचे धोरण कडक आहे.दुग्ध व्यवसायातही स्पर्धा आहे. महाराष्ट्रातील सहकारी दूध क्षेत्रात काही दोष आहेत, त्यात राजकारण आले आहे. व्यवसायातील निकष आणि नियम पाळले जात नाहीत, त्यामुळे राज्यातील सहकारी दूध व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र सरकार दुग्ध व्यावसायिकांच्या पाठीशी आहे. उपस्थितांचे स्वागत रमेश तिवारी यांनी केले. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. वीणा तिवारी यांनी आभार मानले.
‘मेरी हिंदूी मुझेही नही समझती’
विलास लांडे यांचा ‘राष्ट्रवादीचे नेते’ असा उल्लेख करतानाच गिरीश बापट यांनी, तुम्ही राष्ट्रवादीत आहात ना, असा चिमटा काढला. सकाळी राष्ट्रवादीत असलेला कार्यकर्ता संध्याकाळपर्यंत टिकेल का, अशी शंकाच असते, अशी गमतीदार टिप्पणी त्यांनी केली. बापटांनी हिंदूीत भाषण केले. त्यात मराठी शब्दांचा भरणा जास्त होता. ‘मेरी हिंदूी मुझे और सुननेवालो को भी समझ मे नही आती,’ अशी कोटी त्यांनी स्व:तवरच केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा