तो दिवस होता ३ जून २०११. मुसळधार पावसामुळे मुठा उजवा कालवा वाहत होता. वानवडीतील जांभूळकर मळ्यानजीक कालव्यालगत असलेल्या कच्या रस्त्यावर चिखल झाला होता. त्याचवेळी संगणक अभियंता हार्दिक मखवाना (वय २६) आणि त्याचा मित्र चिरायू टेलर (वय ३०) तेथून निघाले होते. कालव्यालगतच्या रस्त्यावर चिखल असल्याने दुचाकी घसरण्याची शक्यता होती. तेथील दिवेही बंद होते. त्यामुळे चिरायू आणि हार्दिक दुचाकी ढकलत निघाले होते. दुचाकी ढकलत निघालेल्या चिरायूच्या मागे हार्दिक होता. काही अंतर चालल्यानंतर चिरायू पक्या रस्त्यावर आला आणि त्याने हार्दिकला हाक मारली. चिखलातून वाट तुडवत येणारा हार्दिक थोडा मागे पडला असेल, असा त्याचा समज झाला. पंधरा मिनिटे झाली तरी हार्दिक आला नाही. त्यामुळे चिरायूने जोरात हाक मारली. मात्र, हार्दिक ने प्रतिसाद दिला नाही. नंतर चिरायूने त्याचा शोध घेतला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे घाबरलेल्या चिरायूने थेट वानवडी पोलीस ठाणे गाठले.
ही घटना सहा वर्षांपूर्वीची असली तरी बेपत्ता झालेल्या संगणक अभियंता हार्दिक मुकेश मखवाना या तरुणाचे बेपत्ता होण्याचे गूढ अद्याप कायम आहे. पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, त्याचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले. मूळचा गुजरातचा असलेला हार्दिक पुण्यात नोकरीनिमित्त स्थिरावला होता. तो आणि त्याचा मित्र चिरायू लुल्लानगर भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीत होते. हे दोघे ३ जून २०११ रोजी कामावरून रात्री आठच्या सुमारास घरी निघाले होते. वानवडी भागात सदनिका भाडेतत्त्वावर घेऊन दोघेजण राहत होते. हार्दिक बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. बऱ्याचदा बेपत्ता झालेली व्यक्ती एक ते दोन दिवसांत सापडते, असा पोलिसांचा अनुभव आहे. किरकोळ वाद किंवा अन्य काही प्रकरणात बेपत्ता झालेल्यांचा महिनाभरात ठावठिकाणा लागतो. पूर्ववैमनस्यातून एखाद्याचा खूनदेखील होतो. त्यामुळे पोलीस बेपत्ता झाल्याची तक्रार (मिसींग) घेतल्यानंतर तक्रारदाराला आठवडाभर थांबा, असा सल्लादेखील देतात.
मात्र, आठवडा उलटूनही हार्दिकचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी थेट पुणे पोलीस आयुक्तालय गाठले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे संगणक अभियंता असलेला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि वानवडी पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. वानवडीचे तत्कालिन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित खडके यांनी तातडीने तपास सुरू केला. तपासपथकातील अधिकारी आणि पोलिसांनी सर्वप्रथम त्याचा मित्र चिरायू याची चौकशी केली. चिरायूने दिलेली तक्रार आणि चौकशीत दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. त्याने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार प्रत्येक गोष्ट पडताळून पाहण्यास सुरुवात करण्यात आली. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी पाऊस पडत होता. त्यामुळे कालवा भरून वाहत होता. घटनास्थळी दिवे बंद असल्याचे चिरायूने सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याने दिलेल्या माहितीची शहानिशा केली. कालव्यातून नेमके किती पाणी वाहत होते, याची माहिती घेण्यात आली तसेच महावितरणच्या अभियंत्याशी संपर्क साधून त्या भागातील वीजप्रवाह खंडित झाला होता का? याची माहिती घेण्यात आली.
कच्या रस्त्यावर चिखल असल्याने हार्दिक घसरून कालव्यात पडला असावा आणि पाण्याला वेग असल्याने तो वाहून गेला असावा अशी शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी वानवडी ते भिगवणपर्यंतच्या प्रत्येक पोलीस ठाण्याला ही माहिती दिली. कालव्या लगतच्या भागाची पाहणी करत पोलिसांनी त्याचा माग काढण्यासाठी थेट भिगवण गाठले. कारण कालव्यात वाहून गेलेली मृत व्यक्ती उजनी धरणाच्या पाणलोटात सापडण्याची शक्यता असते. मात्र, अशाप्रकारे शोध घेऊनही पोलिसांना ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर हार्दिकचा घातपात झाला का, अथवा प्रेमप्रकरणातून त्याचा कोणी काटा काढला का? याचीही माहिती घेण्यात आली. चिरायूने दिलेली प्रत्येक माहिती पडताळण्यात आली. चिरायूच्या दिशेने संशयाची सुई फिरली. त्यामुळे चिरायूची सखोल चौकशी करण्यात आली. त्याने सांगितलेल्या घटनाक्रमाची पाहणी करण्यासाठी त्याची वैज्ञानिक चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पॉलिग्राफ चाचणी घेण्यासंदर्भात पोलिसांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली. न्यायालयाच्या परवानगीने त्याची पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. मात्र, त्यात देखील काही निष्पन्न झाले नाही.
तपासातील प्रत्येक आघाडीवर पोलिसांना अपयश आले. तांत्रिक तपासात हार्दिकच्या मोबाईलचे स्थळ (लोकेशन) तपासण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याच्या दोन बँक खात्यांवरून काही व्यवहार झाला आहे का, यावरदेखील पोलिसांनी लक्ष ठेवले होते. मात्र, तांत्रिक तपासातून काही निष्पन्न झाले नाही. बेपत्ता झालेल्या हार्दिकचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले. मात्र, सहा वर्षांनंतरही तो पोलिसांच्या लेखी बेपत्ता आहे. तो बेपत्ता होण्याचे गूढ कायम आहे.