लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश दिले. बोपदेव घाट परिसरात ३ ऑक्टोबर रोजी रात्री मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोंढवा पोलिसांकडून याप्रकरणआचा तपास करण्यात येत होता. कोंढवा पोलिसंसह गुन्हे शाखेची पथके समांतर तपास करत आहेत. बलात्कार प्रकरणात एका २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. त्याचे दोन साथीदार पसार आहेत. या प्रकरणाचा तपास ६० पथकांकडून करण्यात येत आहे. गु्न्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

आणखी वाचा-पुणे : पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने चोरणारी टोळी गजाआड

या प्रकरणात अटकेत असलेला २५ वर्षीय तरुण मूळचा मध्य प्रदेशातील आहे. त्याच्याबरोबर असलेले दोन साथीदार पसार झाले असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. लूटमारीचे गुन्हे करण्यासाठी ते मध्य प्रदेशातून पुण्यात आले होते. बोपदेव घाटात गुन्हा करण्यापूर्वी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी त्यांचे मोबाइल संच बंद केले. घाटात एके ठिकाणी त्यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर ते लूटमार करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी त्यांनी एकातांत बसलेल्या तरुण-तरुणीला पाहिले. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्यांनी दोघांना मारहाण केली. कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी बोपदेव घाटातून उतरले. अर्धा तास ते एके ठिकाणी थांबले होते. त्यानंतर ते दुचाकीवरून पुढे गेले. त्यांनी मुख्य रस्ता टाळून पायवाटेचा वापर केला. सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात ते गेले. तेथून ते आडमार्गाने गेले.

आणखी वाचा-सावधान! पुण्यात बोगस औषधांची विक्री; अन्न व औषध प्रशासनाकडून तीन विक्रेत्यांवर कारवाई

आरोपींनी या भागात यापूर्वी लुटमारीचे गुन्हे केल्याने त्यांना या भागाची माहिती होती. सीसीटीव्ही कॅमरे कोणत्या भागात आहेत, याचीही त्यांना माहिती होती. सासवड येथील आमराई वस्ती परिसरातील पेट्रोल पंपावरील चित्रीकरणात संशयित आरोपी आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी या भागातील चित्रीकरण तपासले, तेव्हा एका मद्य विक्री दुकानात पाचजण मद्यप्राशन करत असल्याचे आढळून आले. त्यापैकी एक जण सराइत होता. पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेतला. त्याची चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने या प्रकरणतील तीन आरोपींची माहिती दिली. तांत्रिक तपासात एका आरोपीचा वावर बोपदेव घाटात असल्याचे आढळून आले. तांत्रिक तपास, खबऱ्याची माहिती आणि रेखाचित्र तंतोतंत जुळल्याने आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले.