लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील ४० गावे, वाड्या, वस्तींवरील ४५० सराइतांची चौकशी केली. पुणे जिल्ह्यातील घाट, तसेच टेकड्यांच्या परिसरात लूटमार, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराइतांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.
बोपदेव घाट परिसरात गुरुवारी (३ ऑक्टोबर) रात्री मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी ६० पथके तयार केली आहेत. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या ५० हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती संकलित करण्यात आली असून, या माहितीचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. बोपदेव घाटातील माेबाइल संपर्क यंत्रणा क्षीण असल्याने तांत्रिक तपासात अडथळे आले आहेत. आरोपी सासवडमार्गे पसार झाल्याची शक्यता आहे. घटनास्थळापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंतचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.
आणखी वाचा-जुन्नरमध्ये काँग्रेसचे सत्यशील शेरकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार ?
पुणे शहरातील प्रमुख टेकड्या, घाट परिसरात विनयभंग, बलात्कार, दरोडा असे गंभीर गुन्हे केलेल्या आरोपींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बोपदेव घाट परिसरातील ४० गावांमध्ये जाऊन पोलिसांनी पाहणी केली. त्या गावातील ढाबे, दारूविक्रेते, बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांकडे चौकशी करून माहिती घेण्यात आली आहे. पोलिसांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक हॉटेलवरील सीसीटीव्ही तपासले. चित्रीकरणात संपूर्ण परिसर दिसत नसल्याने अडचणी आल्या आहेत. ग्रामीण पोलिसांच्या सासवड, राजगड पोलीस ठाण्यातील तपास पथकांची मदत घेण्यात आली आहे.
कारागृहातील कैद्यांकडे चौकशी
अनेक प्रकरणांत गुन्हेगारांकडून गुन्हेगारांची माहिती मिळते. त्यामुळे तपास पथकांनी येरवडा कारागृहात असलेल्या सराइतांकडे चौकशी सुरू केली आहे. गंभीर गुन्ह्यात कारागृहात असलेल्या कैद्यांना बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपींचे रेखाचित्र दाखवून त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.