पिंपरी : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना अपंगत्वाचेे प्रमाणपत्र देणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील डॉक्टर अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजा खेडकरला मदत करणाऱ्या प्रत्येकाची सखोल चौकशी करावी. बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट असल्यास, ते उघडकीस आणण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.
खेडकर यांना वायसीएम रुग्णालयातून २०२२ मध्ये अपंगत्वाचेे प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यांचा डाव्या गुडघ्याला सात टक्के कायमस्वरूपी अपंगत्व असल्याचे संबंधित प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे. आता हे प्रमाणपत्र देतानाही नियमांचे पालन झाले नसल्याचे आरोप होत आहेत. याच प्रमाणपत्राच्या आधारे पूजा खेडकर यांनी केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या चौकशीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने वायसीएमच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे त्या शासकीय सेवेत रुजू झाल्यात का? अशी शंका उपस्थित केली आहे. याची खात्री पटवण्यासाठी सखोल चौकशी गरजेची आहे. चौकशीत दोषी आढळल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर, तसेच मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा. बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणारे रॅकेट आहे का? हे उघडकीस आणावे. तसेच या संपूर्ण चौकशीचा अहवाल ही जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी आदेशात म्हटले आहे.
हेही वाचा : पिंपरी : ‘पशुसंवर्धन’ची १३ एकर जागा पिंपरी महापालिकेकडे; ‘या’ नागरी सुविधा होणार
याबाबत वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे म्हणाले, की अस्थिरोग व फिजोथेरिपी विभागाला केलेल्या तपासणीचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यांनी अहवाल दिला आहे. प्रमाणपत्र सात टक्क्याचे दिले आहे. केंद्र शासनाच्या नियमावलीचे पालन करून पारदर्शकपणे हे प्रमाणपत्र दिले आहे.