कोरेगाव पार्क आणि कोंढवा भागात गेले वर्षभर एकाने अमली पदार्थ विक्रीचे जाळे तयार केले होते. अमली पदार्थाच्या विक्री व्यवहारात तो ‘प्रिन्स’ या टोपणनावाने तो ओळखला जायचा. खबऱ्याच्या माध्यामातून पोलिसांना ही माहिती मिळाली होती. मात्र, तो अनोळखी व्यक्तीचे दूरध्वनी स्वीकारत नव्हता. माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा हरप्रकारे माग काढण्यास सुरुवात केली. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्याकडून किरकोळ अमली पदार्थही विकतही घेण्यात आले. त्यानंतर त्याची खात्री पटली आणि कोरेगाव पार्क भागात त्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला. मात्र पोलिसांना चुकवण्यासाठी त्याने सीमाभिंतीवरून उडी मारून पलायन केले. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीमुळे अमली पदार्थाच्या व्यवहारातील एक नायजेरियन आरोपी पकडला गेला.

मूळचा नायजेरियाचा असलेला मोझेस अलोका फ्रान्सेस (वय ३५) हा अमली पदार्थ विक्रेता सध्या भाईंदर भागातील मीरा रोड येथे राहायला होता. बेकायदेशीर वास्तव्य करणारे बहुतांश नायजेरियन तरुण हे सायबर गुन्हे आणि अमली पदार्थ विक्रीत सक्रिय आहेत. अनेक नायजेरियन तरुण शैक्षणिक किंवा व्यावसायिक व्हिसा घेऊन देशात येतात. व्हिसाची मुदत संपल्यानंतर अनेक नायजेरियन तरुण बेकायदेशीर व्यवसायात उतरतात. आजमितीला देशभरात नायजेरियन तरुणांचे बेकायदेशीर धंदे ही पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली आहे. वर्षभरापूर्वी मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन तरुणांविरुद्ध मुंबई पोलिसांनी मोहीम सुरू केली होती. त्या वेळी छत्रपती शिवाजी टर्मिनस भागात पोलिसांच्या पथकावर नायजेरियन तरुणांच्या टोळक्याने थेट हल्ला केला होता. दगडफेकही केली होती.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकताच पकडलेला मोझेस फ्रान्सिस हा त्यापैकी एक असावा. गेले वर्षभर तो पुणे शहरातील कोरेगाव पार्क तसेच कोंढवा भागात मेफ्रेडोन आणि कोकेन या अमली पदार्थाची विक्री करत होता. त्याच्याकडून अमली पदार्थ विकत घेणाऱ्या ग्राहकांच्या तो संपर्कात असायचा. त्याच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तीने संपर्क साधल्यानंतर तो प्रतिसाद द्यायचा नाही. पुणे शहरातील अमली पदार्थाच्या व्यवहारात त्याला प्रिन्स या टोपणनावाने ओळखला जायचे. गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना ही माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यांनी त्वरित पोलीस आयुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांना ही महिती दिली. पोलीस निरीक्षक सतीश निकम, जगताप आणि पथकाने या माहितीच्या आधारे मोझेसचा माग काढण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. शेवटी पोलिसांनी खबऱ्याचाच वापर केला. त्याच्या माध्यामातून प्रिन्सशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी खबऱ्याच्या माध्यमातून त्याच्याकडून अमली पदार्थ खरेदी केले. त्यानंतर त्याच्याकडून पुन्हा अमली पदार्थ खरेदी करण्याचा व्यवहार ठरवण्यात आला.

कोरेगाव पार्क भागात त्याला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला. गेल्या शुक्रवारी (११ नोव्हेंबर) मध्यरात्री पेट्रोल पंपाजवळ पोलिसांच्या पथकाने त्याच्यावर पाळत ठेवली होती. त्याच्याकडील पिशवीत अमली पदार्थ होते. पोलिसांना पाहताच तो पळाला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी झटापट करून तो पळाला. तेथून तो ज्वेल्स स्क्वेअर हॉटेलच्या दिशेने पळाला. हॉटेलच्या भिंतीवरून त्याने उडी मारली. अंदाज न आल्याने तो पडला. त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिशवीत वीस हजार रुपयांचे कोकेन आणि सात हजार रुपयांचे मेफे ड्रोन होते.

मोझेसने दोन हिंदी चित्रपटात स्टंटमन म्हणून काम केले होते. कोरेगाव पार्क आणि कोंढवा भागात त्याने अमली पदार्थ विक्रीचे जाळे तयार केले होते. गेले वर्षभर तो पुण्यात होता. अमली पदार्थाच्या व्यसनात महाविद्यालयीन तरुण-तरुणी अडकतात. पुणे शहरात मोठय़ा संख्येने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे तरुण आहेत. त्यांना अमली पदार्थाची चव सुरुवातीला अमली पदार्थ विक्रेते फुकट देतात. त्यानंतर व्यसनाधीन तरुण जाळ्यात ओढले जातात. पोलिसांनी त्याला पकडून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. त्याच्याकडून पुणे शहरातील अमली पदार्थाच्या बेकायदेशीर व्यवसायाची माहिती घेण्यात येत आहे, असे पोलीस निरीक्षक निकम यांनी सांगितले. कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक सतीश निकम, शैलेश  जगताप, परवेझ जमादार, प्रमोद गायकवाड, दीपक खरात, भिलारे यांनी विशेष परिश्रम घेतले.