पुणे : येरवड्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांवर सव्वाकोटी रुपयांच्या अनियमिततेचा ठपका आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने ठेवला आहे. रुग्णालयाची देयके फुगविण्यासह सरकारी निधीच्या गैरवापराचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अधीक्षकांसह तत्कालीन सरकारी कर्मचाऱ्यांकडून ही रक्कम वसूल करावी, अशी शिफारसही समितीने केली आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालयातील आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाने सहायक संचालक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून आपला अहवाल आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्याकडे सादर केला आहे. या अहवालात मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुनील पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. ‘डॉ. पाटील यांनी २०१७ पासून रुग्णालयात १ कोटी २५ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असून, त्यांच्यासह तत्कालीन प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक आणि लिपिक (कारभारी विभाग) यांच्याकडून हे पैसे वसूल करावेत,’ असे समितीने म्हटले आहे.
‘मनोरुग्णालयाच्या सफाईचे कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीशी करारनामा करताना अटींकडे दुर्लक्ष करण्यात आले. कंपनीने स्वच्छता केली की नाही, याची खातरजमा न करता देयके मंजूर करण्यात आली. म्हणजेच कंपनीने काम न करताही डॉ. पाटील यांनी तिला पैसे दिले. याबाबत खासगी कंपनीकडे खुलासा मागविण्यात आला होता. कंपनीने यावर खुलासा देणे टाळले. डॉ. पाटील यांनी नियमबाह्य पद्धतीने कंपनीला देयके दिली,’ असे समितीने म्हटले आहे.
‘सौर उष्ण जल संयंत्र पुरविण्याचा करार पुरवठादाराशी करताना त्यात देखभालीचा दर वाढवून दाखविण्यात आला. कंत्राटदाराने प्रत्यक्षात इलेक्ट्रिक हीटरचा वापर करून रुग्णालयाचे वर्षानुवर्षे आर्थिक नुकसान केले. सौर उष्ण जल संयंत्र खरेदीत डॉ. पाटील यांनी कोणतीही प्रशासकीय प्रक्रिया पार पाडली नाही. ही संयंत्रे बसविण्यात न आल्याने मनोरुग्णांना हिवाळा आणि पावसाळ्यात थंड पाण्याने स्नान करावे लागले. त्यामुळे त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाले. या संयंत्र बसविण्याच्या प्रक्रियेत पाटील यांनी ७३ लाख रुपयांचा अपहार केला,’ असे समितीने नमूद केले आहे.
अहवालात आणखी काय?
खासगी पुनर्वसन केंद्रात पाठविल्याने १८ मनोरुग्णांचा मृत्यू
सेंटर फॉर एक्सलन्सच्या खरेदीत ८ ते १० लाखांची अनियमितता
व्यसनमुक्ती केंद्राचा ११ लाख रुपयांचा निधीमध्ये गैरव्यवहार
खासगी पुनर्वसन केंद्रात रुग्णांची रवानगी
मनोरुग्णांना पाणी घातलेल्या दुधाचा पुरवठा
मनोरुग्णांच्या अंतर्वस्त्र खरेदीत गैरव्यवहार
रुग्णालयाच्या साहित्य खरेदीत १९ लाखांचा गैरव्यवहार
प्रादेशिक मनोरुग्णालयातील आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल मिळाला आहे. यात चौकशी समितीने चार जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यातील वर्ग -३ च्या कर्मचाऱ्यांवर माझ्या पातळीवर कारवाई केली जाईल. उरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस आरोग्य मंत्रालयाकडे करण्यात येईल. डॉ. राधाकिशन पवार, उपसंचालक, आरोग्य विभाग