पुणे : ‘आत्मनिर्भरतेअंतर्गत भारतीय लष्कराने आधुनिकीकरणाच्या माध्यमातून लक्षणीय प्रगती केली आहे. परिवर्तनावरही लक्ष केंद्रित करण्यात येत असून, सध्या भारतीय लष्कर व्यावसायिकतेच्या शिखरावर आहे,’ असे मत लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी मांडले.

दक्षिण मुख्यालयातर्फे बॉम्बे इंजिनीअर ग्रुपच्या संचलन मैदानावर झालेल्या ‘इन्व्हेस्टिचर सेरेमनी’मध्ये सेठ बोलत होते. अतुलनीय योगदान दिलेल्या अधिकाऱ्यांचा, तुकड्यांचा सन्मानही याच कार्यक्रमात सेठ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात ३४ अधिकारी, तर २७ तुकड्यांना गौरविण्यात आले. त्यापैकी आठ सेना पदके शौर्यासाठी, नऊ सेना पदके विशेष सेवेसाठी, १४ विशिष्ट सेवा पदके, दोन विशिष्ट सेवा पदके, एक उत्तम जीवन रक्षा पदक, २७ अधिकाऱ्यांना पदके प्रदान करण्यात आली.

हेही वाचा – ‘एफटीआयआय’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा? केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांचे संकेत

u

महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ येथे घडलेल्या आपत्तीच्या काळात मदतीसाठी जवानांनी केलेल्या कामाचे कौतुक सेठ यांनी केले. ते म्हणाले, ‘दक्षिण मुख्यालयाचे कार्यक्षेत्र मोठे आहे. त्यात १२०० किलोमीटरच्या आंतरराष्ट्रीय सीमा, ७ हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. त्यामुळे भूभागाच्या संरक्षणासाठी दक्षिण मुख्यालय, भारतीय हवाई दल, नौदल आणि तटरक्षक दल यांच्या समन्वयाने काम चालते. तसेच, मित्र राष्ट्रांसह संयुक्त सरावही आयोजित करण्यात येतात. दक्षिण मुख्यालय केवळ भविष्यातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठीच नाही, तर देशाच्या सशक्तीकरणासाठी सक्षम, सज्ज आणि कटिबद्ध आहे. दक्षिण मुख्यालयातर्फे अनेक नवे उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याद्वारे तंत्रज्ञानाचा वापर भविष्यातील रणनीतिचा एक अविभाज्य भाग असल्याचे सुनिश्चित होईल.’

‘आर्मी डे परेड’च्या आयोजनाचा मान दक्षिण मुख्यालयाला मिळाला आहे. या निमित्ताने मॅरेथॉन, ‘नो यूवर आर्मी’ प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात लष्करासह सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी होता आले, असेही सेठ यांनी नमूद केले.

हेही वाचा – पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण

संचलनाला दाद

‘आर्मी डे परेड’ १५ जानेवारी रोजी पहिल्यांदाच पुण्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेली ‘इन्व्हेस्टिचर परेड’ विशेष महत्त्वाची होती. या संचलनाच्या माध्यमातून भारतीय लष्कराच्या सक्षमतेचे दर्शन घडवण्यात आले. वेगवेगळ्या आठ पथकांनी संचलन केले. तसेच, आधुनिक शस्त्रसामग्री, लष्करी वाहने, ड्रोन, रोबोटिक म्यूल, रडार, रणगाडे यांचाही यात समावेश होता. संचलनावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवाय, लढाऊ विमानांनी सलामीही दिली. या संचलनाला उपस्थितांकडून दाद देण्यात आली.

Story img Loader