गेल्या काही वर्षांत गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी एखाद्या योजनेत गुंतवणूक करताना तज्ञांचे मत जाणून घेणे गरजेचे आहे. व्याजाच्या प्रत्येक टक्क्य़ावर जोखीम वाढते. या पाश्र्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सजग असायला हवे, असे मत गुंतवणूक क्षेत्रातील तज्ञांनी शुक्रवारी व्यक्त केले.
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुंतवणूकदार जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत गुंतवणूकदारांसाठी तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान शुक्रवारी आयोजित करण्यात आले होते. सनदी लेखापाल विनित देव, डॉ. क्षितिजा सोमण, हेमंत काळे, कोटक म्युचअल फंडचे सहायक उपाध्यक्ष सुधीर भगत यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, उपायुक्त किशोर नाईक, पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, निलीमा जाधव यावेळी उपस्थित होते.
विनित देव म्हणाले, फसवणुकीच्या बऱ्याच घटनांमध्ये गुन्हा झाले हे सिध्द करणे अवघड असते. त्यामुळे लेखी करार करण्याची काळजी घेण्यात यावी तसेच गुंतवणूकदारांनी तज्ञांचे मत घ्यावे. आकर्षक परतावा देणारी वित्तीय संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे, याचीही माहिती असणे गरजेचे आहे. जेवढा जास्त परतावा तेवढी जोखीम जास्त असते. मोठे उद्योजकदेखील जोखीम पत्करून गुंतवणूक करतात. तज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच जोखीम पत्करावी.
ज्या वित्तीय संस्थेत आपण गुंतवणूक करतो. त्या संस्थेचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे. अगदी संचालकांची माहिती घ्यावी. एकीकडे आर्थिक साक्षरता वाढत असताना फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, हे देखील दुर्लक्षित करून चालणार नाही. जोखीम आणि परतावा या दोन्ही बाबी एकमेकांशी निगडित आहेत, असे डॉ. क्षितिजा सोमण यांनी स्पष्ट केले.
म्युचुअल फंड, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षीत समजली जाते. जोखीम असलेल्या गुंतवणुकीचा थेट परिणाम गुंतवणूकदाराच्या आरोग्यावर होतो, असे सुधीर भगत यांनी सांगितले. हेमंत काळे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.