पिंपरी-चिंचवड शहर आणि चाकण, तळेगाव दाभाडे, रांजणगाव या औद्योगिक पट्ट्यात झपाट्याने औद्योगिकीकरण झाले. या भागात आंतरराष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे सूक्ष्म, मध्यम, लघुउद्योगांची वाढ झाली. या कंपन्यांना कच्चा माल पुरविणाऱ्या लघु उद्योगांमुळे या भागातील अर्थकारणाला चालना मिळाली. या भागात सुमारे २० हजार २५० सूक्ष्म, लघु उद्योग आहेत. पायाभूत सुविधा, उद्योगासाठी असलेले पोषक वातावरण यामुळे गुंतवणूकदारांची या भागाला पसंती मिळत आहे. असे असले, तरी जागेची कमतरता असून औद्योगिक पट्ट्याच्या विस्तारीकरणासाठी शेतकऱ्यांकडून जमीन अधिग्रहण करावी, अशी अपेक्षा उद्योजकांची आहे. उद्योगनगरीला अजून विस्तारायला वाव आहे.
पिंपरी-चिंचवडने १९५० मध्ये हिंदुस्थान अॅण्टिबायोटिक्ससारख्या कारखान्याने आपला औद्योगिकीकरणाचा पाया रचला व तेथून शहराचा उद्योगनगरी म्हणून प्रवास सुरू झाला. औद्योगिक क्रांती झाल्यावर शहराला अनेक उद्याोजकांनी पसंती दिली. १९३५ नंतर टाटा मोटर्स (टेल्को), बजाज ऑटो, बजाज टेम्पो (फोर्स मोटार), अॅटलस कोप्को, फोर्ब्स मार्शल, गरवारे ग्रुप, महिंद्रा आणि महिंद्रा, ग्रीव्हज्, एसकेएफ, थायसन क्रुप, अल्फा लावल अशा अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांनी पिंपरी-चिंचवडला उद्योगनगरी म्हणून आशिया खंडात ओळख निर्माण करून दिली. तसेच देशभरातून छोटे-मोठे उद्याोजक लघुउद्योजकांच्या माध्यमातून शहरात व्यवसाय करू लागले. अनेक राज्यांतील कुशल व अकुशल कामगारांचा ओढा शहराकडे वाढला व त्यातूनच १९८२ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका अस्तित्वात आली.
वाढती लोकसंख्या डोळ्यांसमोर ठेवून विकास आराखडा तयार करण्यात आला. पिंपरी एमआयडीसी, चिंचवड एमआयडीसी, भोसरी एमआयडीसी, आकुर्डी, तळवडे एमआयडीसी अशा शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी औद्याोगिक महामंडळाने उद्याोग-वाढीसाठी चालना दिली. व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली सर्व यंत्रणा रस्ते, मुबलक पाणी, लोहमार्ग, वीज उपलब्ध असल्याने उद्याोजकांनी प्रमुख पसंती दिली. सद्या:स्थितीत पिंपरी-चिंचवड एमआयडीसीत बहुउद्देशीय कंपन्यांना सुटे भाग पुरविणारे सुमारे १६ हजार सूक्ष्म, लघुउद्योग सुरू आहेत. या १६ हजार उद्योगांमध्ये सात लाख कामगारांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. लघु उद्योग वाहनांचे सुटे भाग (ऑटोमोबाइल्स पार्टस) संरक्षण विभागाला लागणारे सुटे भाग, प्रेस पार्ट, रबर, प्लास्टिक, इंजिन १अरिंग कंपन्यांसाठीचे फॅब्रिकेशन उत्पादन करतात. शहरातील मोठ्या उद्योगांसह विदेशातील उद्योगांना हे सुटे भाग पुरविले जातात. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, नेपाळ, अरबी राष्ट्रांमध्ये निर्यात करतात. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) येथून मालाची निर्यात केली जाते. मागील १५ वर्षांपासून निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. ३० हजार कोटींहून अधिक वस्तू व सेवा कर पिंपरी-चिंचवड एमआयडीसी राज्य शासनाला देते. काळानुसार कामाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. अत्याधुनिक मशिनरी आल्या. त्यामुळे उत्पादनाचा दर्जाही वाढला.
औद्योगिक क्षेत्र विस्तारत असून उद्योजकांची पुण्याला पसंती मिळत आहे. जागेची कमतरता आहे. पण, त्यामुळेच पिंपरी-चिंचवड हद्दीतील छोटे-मोठे कारखाने रांजणगाव, चाकण, तळेगाव दाभाडे एमआयडीसीमध्ये स्थलांतरित झाले. मात्र, त्यानंतरही शहरात उद्योजकांना जागा अपुरी पडत आहे. एमआयडीसीच्या भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण काढून लघु, सूक्ष्म उद्योजकांना जागा देण्याची मागणी पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे करतात. एमआयडीसीच्या स्थापनेपासून औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्राचे एच ब्लॉक येथे आरक्षण आहे. त्याबाबत सातत्याने बैठका झाल्या, पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. शहरातील उद्योगांमध्ये निर्माण होणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नाही. एमआयडीसीत घातक कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असतात. रांजणगाव येथील एका खासगी कंपनीच्या प्रकल्पात कचरा देण्याचे आवाहन केले जाते. मात्र, हा प्रकल्प कमी क्षमतेचा आहे. कचरा उचलण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही. यामुळे येथील उद्योजकांची अडचण होत आहे. घातक कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वर्तुळाकार मार्ग सुरू करण्याची उद्योजकांची मागणी आहे.
चाकण : वाहन उद्योगाची पंढरी
चाकण औद्योगिक वसाहत हे वाहननिर्मिती उद्याोगाचे महत्त्वाचे केंद्र असून, सात हजार एकरावर विस्तारले आहे. औद्योगिक वसाहतीत सुमारे ३० लाख कामगार काम करतात. सुमारे चार हजार कंपन्यांचे जाळे आहे. यामध्ये राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे मोठे जाळे आहे. २००५ नंतर चाकण भागातील औद्योगिकीकरण वाढले. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली. चाकण औद्योगिक वसाहतीत नाणेकरवाडी, खराबवाडी, मेदनकरवाडी, कुरुळी, निघोजे, महाळुंगे, शिंदे, वासुली, भांबोली, वराळे, आंबेठाण, सावरदरी, खालुंब्रे या भागातील जमिनी संपादित करण्यात आल्या. औद्योगिक वसाहतीमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. चाकण औद्योगिक वसाहतीत बजाज ऑटो, महिंद्रा फोक्सवॅगन, मर्सिडीज बेंज, हुंडाई, सॅनी इंडिया, जीई, गॅब्रियल, स्पायसर, लॉरियल, एअर लिक्विड, फिलिप्स, बॉश अशा छोट्या- मोठ्या सुमारे चार हजारांवर कंपन्या आहेत. बजाज ऑटो कंपनी येथे आल्यानंतर तसेच कुरूळी येथे भारत फोर्जचा प्रकल्प झाला त्यानंतर औद्याोगिकीकरणाने वेग घेतला. कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले गेले. त्यामुळे लघु उद्योगाला चालना मिळाली. कंपन्यांना माल पुरवणाऱ्या, वाहनांसाठी सुटे भाग पुरविणारे लघुउद्योग वाढले, विस्तारले
चाकण एमआयडीसीतून सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा महसूल वर्षाकाठी सरकारला दिला जातो. औषधे, त्याला लागणारा कच्चा माल, सौंदर्यप्रसाधने उत्पादन करणाऱ्या कंपन्याही या परिसरात आहेत. उद्योगांना पोषक वातावरण, ग्रामस्थांची साथ यामुळे चाकण परिसरात औद्योगिकीकरण वाढले. हा समृद्ध परिसर असून, देशाचा आर्थिक कणा आहे. उद्याोजकांनी सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) शाळा इमारत, पाणी प्रकल्प, पोलीस ठाणे बांधून दिले. उद्याोग आपल्याला पोषक असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी सहकार्य केले. परिणामी, गुंतवणूक वाढली. स्थानिकांना रोजगार मिळाला. अर्थकारणाला चालना मिळाली. प्रगती झाली. अपप्रवृत्तीच्या लोकांना स्थानिकच समजावून सांगू लागले. पोषक वातावरण असल्याने उद्योजकांनी चाकणमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले. अमेरिका, इटली, फ्रान्स यांसह जगातील कंपन्या चाकणमध्ये आहेत. असे असले, तरी पुणे -नाशिक महामार्ग, चाकण -तळेगाव, चाकण-शिक्रापूर या मार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येथील उद्याोगांचा श्वास कोंडल्याचे फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप बटवाल सांगतात. कोंडीने उद्याोगांचा गळा आवळला आहे. प्रशासनाने लवकर जागे व्हावे. मालाची निर्यात करण्यासाठी अडचणी येत आहेत. माल वाहतुकीचा खर्च अधिक आहे. आयात-निर्यातीसाठी तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर सुविधा करावी. खेड तालुक्यातील येलवाडीपर्यंत रेल्वेचे जाळे विस्तारण्याची उद्योजकांची मागणी आहे.
तळेगाव : उदयोन्मुख गोदाम ठिकाण
एमआयडीसीने नवलाख-उंब्रे, आंबी या गावांच्या हद्दीत सुमारे ५८५ हेक्टर जमीन तळेगाव दाभाडे औद्याोगिक क्षेत्र म्हणून विकसित केली आहे. एमआयडीसी तळेगाव येथील औद्योगिक क्षेत्र पाच टप्प्यांमध्ये विकसित करत आहे. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीमुळे तळेगाव परिसरातील औद्योगिकीकरणाला आणखी चालना मिळाली आहे. अनेक ऑटोमोबाइल सहायक कंपन्यांनी औद्योगिक जमीन विकत घेतली आहे. तळेगाव येथे त्यांचे उत्पादन केंद्र स्थापित केले आहे. चाकण, खेड, पुणे शहर, मुंबई, जेएनपीटी बंदर आणि काही प्रमुख महामार्गांच्या जवळ असल्याने तळेगाव हे महाराष्ट्रातील एक उदयोन्मुख गोदाम ठिकाण देखील झाले आहे. तळेगाव एमआयडीसी पुणे-मुंबई महामार्गापासून अगदी जवळ आहे. मुंबई, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टशी (जेएनपीटी) वेगवान ‘कनेक्टिव्हिटी’ आहे. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड, बोर्गवॉर्नर उत्सर्जन, ओग्निबेन इंडिया, शेफलर इंडिया, मॅग्ना इंटरनॅशनल, कॉस्मा इंटरनॅशनल इंडिया, सिंटरकॉम, हुस्को हायड्रॉलिक्स प्रा. या कंपन्यांमध्ये ऑटोमोबाइलची निर्मिती केली जाते. तळेगाव एमआयडीसीत दोन लाखांहून अधिक कामगार काम करत आहेत.
रांजणगाव : औद्योगिक वैविध्य
रांजणगाव एमआयडीसीमध्ये ५५० प्लॉट आहेत. दीडशे मोठ्या कंपन्या आहेत. फियाट, टाटा ऑटोकॉम्प, जबिल, बजाज इलेक्ट्रिकल्स, व्हर्लपूल, कमिन्स जनरेटर्स टेक्नॉलॉजीज, जीप इंडिया ऑटोमोबाइल्स, हायर अप्लायन्सेस आणि आयटीसी लिमिटेड यांसारख्या अनेक प्रमुख कंपन्या आहेत. तर, ४०० लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योग आहेत. हे उद्योग मोठ्या कंपन्यांना वाहनांचे सुटे भाग, पूरक साहित्य पुरवतात. घरगुती उपकरणाचीही निर्मिती केली जाते. ‘एमआयडीसी’मध्ये दोन लाख कामगार काम करतात. त्यामुळे परिसरातील अर्थकारणाला चालना मिळाली. उद्याोगांनी सामाजिक दायित्व निधीतून पाणी, स्वच्छता, आरोग्य, शाळा, मुलींच्या आरोग्याबाबत काम केले. मजबूत पायाभूत सुविधा आणि व्यवसाय वाढीसाठी अनुकूल वातावरण यांसारख्या घटकांमुळे या उद्याोगांनी रांजणगावमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. यामुळे रांजणगाव समृद्ध व्यावसायिक केंद्र बनले आहे. पुणे ‘क’ वर्गवारीत होते. त्यामुळे नवीन उद्योगांना विविध सवलती मिळत होत्या. परंतु, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) ची स्थापना झाल्याने पुणे ‘अ’ वर्गवारीत मोडले जात आहे. त्यामुळे सवलती मिळणे बंद झाले. याबाबत उद्योग मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे रांजणगाव इंडजस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले.
ganesh. yadav@expresssindia.com