पिंपरी : दोन कोटी रूपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ विक्री प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. हॉटेल कामगाराला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून निगडी पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाचे नाव समोर आले आहे. उपनिरीक्षकाचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा संशय असल्याने त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नमामी शंकर झा (वय ३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी नमामी हा एका हॉटेलमध्ये कामाला आहे. या प्रकरणात निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या एका उपनिरीक्षकाची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. आरोपी नमामी याला पिंपळे निलख विशालनगर परिसरात मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ विक्रीसाठी आला असताना पोलिसांनी त्याला सापळा रचून पकडले. त्याच्या कडील सफेद रंगाच्या पिशवीत दोन कोटी दोन लाख रुपये किमतीचे एकूण २ किलो ३८ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ जप्त करण्यात आले.
हेही वाचा >>>कर्नाटकातील भाजप पदाधिकाऱ्याचा खून; पुण्यातून आरोपी अटकेत
एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन कोठून आणले याची विचारणा पोलिसांनी केल्यावर नमामीने निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाचे नाव घेतले आहे. सांगवी पोलिसांनी याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर संबंधित उपनिरीक्षकाला सांगवी पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. त्याची सकाळपासून चौकशी सुरू होती. मात्र, संबंधित उपनिरीक्षकाचा नमामी याच्याशी कसा संपर्क आला. नमामीने दोन कोटी २ लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ कोठून आणले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. उपनिरीक्षकाचा या प्रकरणात नेमका संबंध काय आहे, हे देखील अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याने अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, उपनिरीक्षकाचा अमली पदार्थ प्रकरणाशी संबंध उघड होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.