शंभर आयफोन खरेदी केल्यास त्यावर ५० आयफोन मोफत देण्याचा बहाणा करून १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नायझेरियन नागरिकासह दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांनाही गुरुवापर्यंत (२४ सप्टेंबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
प्रदीप सुरेश मगरे (वय २६, रा. सुभाषनगर, चेंबूर, मुंबई) आणि इफयानी ऊर्फ माईक मायकेल ओगु (वय ३५, रा. खारघर, नवी मुंबई, मूळ रा. नायझेरिया) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी अनुभव नवीनबाबू गुप्ता (वय २१, रा. टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक) यांनी फिर्याद दिली होती.
अनुभव गुप्ता यांना आरोपींनी एक ई-मेल पाठविला होता. शंभर आयफोन खरेदी केल्यास ५० आयफोन मोफत देण्याचे आमिष या ई-मेलमध्ये दाखविण्यात आले होते. त्यासाठी या दोघांनीही गुप्ता यांना वेगवेगळ्या बँकेच्या खात्यामध्ये एकूण १८ लाख १० हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार बँक खात्यामध्ये पैसे भरूनही गुप्ता यांना मोबाईल मिळाले नाहीत आणि त्यांचे पैसेही परत मिळाले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच गुप्ता यांनी ३१ जुलै रोजी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या अनुषंगाने तपास करताना पोलिसांनी मगरे आणि ओगु या दोघांना अटक केली.
या दोघांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. ज्या खात्यावर पैसे भरले ती खाती कोणाची आहेत, फसवणूक झालेली रक्कम हस्तगत करावयाची आहे, नायझेरियन नागरिकाने विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगून ते काढून घेतले असल्याने त्याच्याकडेही तपास करावयाचा आहे. आरोपींनी कॉम्प कंपनीचा विक्री प्रतिनिधी फारुख खान या नावाने बोलत असल्याचे सांगून गुप्ता यांची फसवणूक केली आहे. आरोपींचा आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असण्याची शक्यता असून त्यांचा मुख्य सूत्रधार कोण याचा तपास करावयाचा असल्याने सरकारी वकील ए. के. पाचारणे यांनी दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. ती न्यायालयाने मंजूर करीत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.