‘आयपीएल’ च्या मुंबई-चेन्नई क्रिकेट संघातील अंतिम सामन्यावर बेटिंग लावणाऱ्या पाचजणांना पिंपरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्याकडून दोन लाख ६० हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. तथापि, बुकी फरार झाला आहे.
पोलीस निरीक्षक मोहन विधाते यांच्या नेतृत्वाखाली फौजदार ए. आर. शेख, एल. एन. सोनवणे यांच्या पथकाने सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई केली. या प्रकरणी अनिल पेरवानी, सनी मंगलानी, प्रदीप तलरेजा, दिनेश शर्मा, किशोर पोपटानी यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून राम बजाज हा बुकीचे काम करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, वैभवनगर येथील बजाजच्या घरावर पोलिसांनी छापा मारला. मात्र, तो पळून गेला होता.
या संदर्भात, फौजदार शेख यांनी सांगितले, पिंपरीगावातील हॉटेल समृध्दी येथे क्रिकेटवर सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला. पाचजणांना जागीच अटक करण्यात आली. मात्र बुकी बजाज फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे.

Story img Loader