आयपीएलच्या या हंगामातील तीन सामने पुण्याजवळील गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर होणार आहेत. या सामन्यांच्या सुरक्षितेसाठी पुणे ग्रामीण पोलीस सज्ज झाले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व तयारी झाली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अजय शिर्के उपस्थित होते. लोहिया म्हणाले, की आयपीएलच्या या हंगामातील १०, १५ आणि १८ एप्रिल रोजी होणारे तीन क्रिकेट सामने गहुंजे येथील मैदानावर रात्री आठ वाजता होणार आहेत. या सामन्यांसाठी साधारण पाचशे ६५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. क्रिकेट सामने पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी सुरक्षितेतच्या तपासणी करताना सहकार्य करावे. या मैदानावरील एक ते तीन क्रमांकाची प्रवेशद्वारे ही तिकीटधारकांसाठी राहणार आहेत. क्रिकेट सामना पाहण्यासाठी पुण्याहून चारचाकी मोटारीने येणाऱ्यांनी किवळे पुलाच्या अगोदर डाव्या बाजूच्या सव्‍‌र्हिस रस्त्याने मैदानाकडे यावे. तर दुचाकी वाहन चालकांनी जुन्या महामार्गाने मामुर्डी गावातून मैदानाकडे यावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांच्या सर्व सूचनांचे पालन करावे. त्याबरोबरच सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रेक्षकांनी दोन तास अगोदरच मैदानावर यावे. मैदानात जाताना सोबत पिशव्या, पर्स असे साहित्य शक्यतो आणू नये. मैदानात पाण्याच्या बाटल्या, नेलकटर, खाद्यपदार्थ अशा वस्तू आणू नये. आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्यास तत्काळ पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्षाला (०२०२५६५७१७१) कळवावे, असे आवाहन लोहिया यांनी केले.
या सामन्यांना पुरविण्यात येणारी सुरक्षा व्यवस्था ही पेड स्वरूपाची असते. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांना एमसीएकडून ४१ लाखांचा धनादेश देण्यात आल्याचे लोहिया यांनी या वेळी स्पष्ट केले.
पहिल्या सामन्यांची नव्वद टक्के तिकिटे संपली
गहुंजे मैदानाची क्षमता ३८ हजार आहे. पहिला क्रिकेट सामना हा येत्या १० एप्रिल रोजी रात्री आठ वाजता किंग्ज इलेव्हन पंजाब व राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या सामन्याची नव्वद टक्के तिकिट विक्री झाली आहे. मैदानात सुरक्षिततेसाठी एमसीएकडून सातशे सुरक्षारक्षक तैनात केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अजय शिर्के यांनी दिली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा