शहरात साथरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना महापालिकेच्या आरोग्य विभागात आता बेशिस्तीची साथ पसरली आहे. आरोग्य विभागाच्या प्रमुखपदी अधिकारी टिकत नसल्याचे वर्षानुवर्षे जुनेच दुखणे आहे. त्यातच आता विभागातील इतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृतीमुळे विभाग चर्चेत आला आहे. या विभागात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चक्क महापालिका आयुक्तांच्या आदेशाला केराचा टोपली दाखविण्यापर्यंत मजल गेली आहे. आरोग्य विभागात बेशिस्तीची ही साथ पसरली असून, आयुक्त यावर उपाय करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत मागील काही काळात सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचा अधिकारी महापालिकेत आरोग्यप्रमुखपदी असतो. अनेक वेळा हा अधिकारी येऊन कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची गच्छंती होते अथवा येथील गटबाजी आणि राजकारणाला कंटाळून तो निघून जातो. त्यामुळे या पदावर प्रभारी म्हणून बसलेल्या अधिकाऱ्यांची यादीच मोठी दिसते. विभागाला स्थिर प्रमुख नसल्याने सर्वच अधिकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांत आपापले स्वतंत्र संस्थान सुरू केले. माझा विभाग मी हव्या त्या पद्धतीने सांभाळणार, त्यात मला कोणाचाही हस्तक्षेप नको, अशी भूमिका अनेक अधिकारी घेऊ लागले. त्यातून तुझे तू आणि माझे मी असे नवे समीकरण उदयास आले. हा प्रकार बिनबोभाट काही वर्षे सुरू होता. मागील काही दिवसांपूर्वी हा परस्पर संगनमताचा करार भंगला आणि एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली.
हेही वाचा >>> शिक्षक दिन विशेष : विद्यार्थीच झाले विद्यार्थ्यांचे शिक्षक… कुठे आहे ही अनोखी शाळा?
आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या दिशेने बोट दाखविण्यास सुरुवात केली. त्यात एकमेकांवर कुरघोड्या सुरू झाल्या. काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. भ्रष्टाचाराचे आरोपही करण्यात आले. या प्रकरणी काही सामाजिक संस्थांनी वारंवार तक्रारी करून आंदोलन केले. यामुळे अखेर महापालिकेचा आरोग्य विभाग जागा झाला. या प्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. मात्र चौकशी करावयाची त्या अधिकाऱ्याचे समकक्ष आणि कनिष्ठ अधिकारी समितीत नेमण्याचा उफराटा कारभार करण्यात आला. त्यातून या चौकशीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
हेही वाचा >>> कोंढव्यातील बनावट दूरध्वनी केंद्र आठ वर्षांपासून – दहशतवाद विरोधी पथकाकडून तिघे अटकेत
आरोग्य विभागातील अनागोंदीची अखेर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दखल घेतली. त्यांनी आरोग्य विभागात फेरबदल केले. यात अधिकाऱ्यांची खाती बदलण्यात आली. या बदलीच्या आदेशानंतर काही अधिकारी तातडीने वैद्यकीय रजेवर निघून गेले. यामुळे त्यांचा पदभार इतर अधिकाऱ्यांकडे कसा सोपवायचा, असा यक्षप्रश्न निर्माण झाला. यावर एकतर्फी पदभार स्वीकारण्याचा तोडगा काढण्यात आला. त्यामुळे संबंधित अधिकारी हे रजेवर असताना त्यांचा पदभार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला. एवढ्यावरच हे प्रकरण न थांबता एका अधिकाऱ्याने चक्क शासकीय फायलीच घरी नेल्या. यावरून गदारोळ होऊन पुन्हा नोटीस बजावून चौकशी असे चक्र सुरू झाले.
आयुक्तांच्या आदेशाला आव्हान देण्यापर्यंत काही अधिकाऱ्यांची मजल गेली. या प्रकरणी आपल्यावर काहीच कारवाई होऊ शकत नाही, अशी भूमिका काही अधिकाऱ्यांनी उघडपणे घेतली आहे. राजकीय पाठबळाच्या जोरावर हे अधिकारी निर्ढावलेले आहेत. आयुक्तांच्या प्रशासकीय बदलीच्या आदेशालाही न जुमानणारे अधिकारी जनतेचे म्हणणे कितपत ऐकून घेत असतील, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. शहरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याची काळजी हा विभाग घेतो. आता याच विभागाला सध्या लागलेली बेशिस्तीची साथ दिवसेंदिवस वाढत आहे. sanjay.jadhav@expressindia.com