कोटय़वधी रुपयांच्या सिंचन घोटाळा प्रकरणात कोकण पाटबंधारे विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता बाळासाहेब पाटील (वय ६२) यांच्या पुणे, कोल्हापूर व सांगली येथील घरांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती घेतली असून, त्यात आतापर्यंत पावणेदोन कोटी रुपयांची अपसंपदा आढळून आली आहे. पुण्यात पाटील यांच्या सदनिकांची तपासणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पाटील यांच्या बंगल्याची झडती घेण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्य़ातील ४० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा सकाळीच पाटील यांच्या बंगल्यावर पोहोचला. पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा १ कोटी ५९ लाख रुपये बेहिशोबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले होते.