अविनाश कवठेकर, लोकसत्ता
पुणे : मनसेचे नेते, पुणे लोकसभा निवडणुकीचे समन्वयक अमित ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर शहर मनसेतील वाद संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. अतिम ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर आणि त्यांनी केलेल्या सूचनेनुसार माजी शहराध्यक्ष वसंत मोरे पक्ष कार्यालयात बुधवारी उपस्थित राहिले. त्यामुळे हा वाद मिटल्याची चर्चा आहे. पक्षहितासाठी दहा वेळा माघार घेईन, अशी सूचक प्रतिक्रियाही भेटीनंतर वसंत मोरे यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून शहर मनसेमधील दोन गटांतील वाद सातत्याने पुढे आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी त्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर मोरे यांची शहराध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि मोरे विरोधात शहर पदाधिकारी असे चित्र निर्माण झाले. गेल्या वर्षभरापासून या दोन गटांत वाद सुरू असल्याने राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा अपवाद वगळता अन्य वेळी पक्षकार्यालयात न जाण्याची भूमिका मोरे यांनी घेतली होती.
आणखी वाचा-‘पीडीसीसी’ बँकेच्या माध्यमातून पार्थ पवारांचा सक्रिय राजकारणात प्रवेश?
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची तयारी सुरू झाली आहे. अमित ठाकरे यांच्याकडे पुणे लोकसभेची जबाबदारी सोपविण्यात आली असून गणेशोत्सवापूर्वी त्यांनी विभागनिहाय बैठकाही घेतल्या होत्या. त्यातच मनसेने संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली असून पुण्यातून मोरे यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मोरे यांनीही तयारी सुरू केली असून भावी खासदार अशा आशयाचे फलकही शहरात लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत मोरे यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली. या दोघांमध्ये एक तास चर्चा झाली. त्यावेळी पक्ष कार्यालयात जाण्याची सूचना अमित यांनी मोरे यांना केल्यानंतर तातडीने मोरे बुधवारी पक्ष कार्यालयात दाखल झाले. पक्षासाठी दहा वेळा माघार घेईन, अशी प्रतिक्रिया मोरे यांनी दिली.