मराठी चित्रपटसृष्टीला वैभवाचे दिवस आल्याचा डंका वाजत असतानाच समन्वयाच्या अभावामुळे होणारे नुकसानही दिसून येत आहे. नववर्षांच्या प्रारंभी ‘बीपी’ (बालक-पालक) ने जोरदार सुरुवात केली असताना एकापाठोपाठ एक मराठी चित्रपटांचा धडाका सुरू झाला. १२ एप्रिलच्या शुक्रवारी एकही चित्रपट प्रदर्शित न करणाऱ्या निर्मात्यांनी १९ एप्रिलला रामनवमीच्या दिवशी एकाच वेळी सात चित्रपट प्रदर्शित केले आहेत. यातील किती चित्रपट ‘राम’ म्हणणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
तगडय़ा हिंदी चित्रपटसृष्टीशी स्पर्धा, अपुरे बजेट, वसूल न होणारा खर्च, थिएटर मिळवण्यासाठी करावी लागणारी मारामार अशा अनेक समस्यांतून मार्ग काढणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीला या नव्या ‘उद्योगां’ मुळे आणखी खडतर वाटेने जावे लागणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. तीन वर्षांपूर्वी जानेवारी महिन्यातच ‘नटरंग’, ‘झेंडा’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ असे चित्रपट एकापाठोपाठ प्रदर्शित झाले होते. त्यानंतरच्या काळातही कमी-अधिक प्रमाणात हा प्रकार सुरू होता. यंदाच्या वर्षांरंभी रवी जाधवच्या ‘बालक-पालक’ ने धडाकेबाज सुरुवात करून अक्षरश: ‘कल्ला’ केला. सतीश राजवाडे व अतुल कुलकर्णीच्या ‘प्रेमाची गोष्ट’ ला देखील प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली. सचिन खेडेकरचा ‘एक दिवस माझा’ मधील मुख्यमंत्री प्रेक्षकांना आवडून गेला. त्यापाठोपाठ निवेदकातून नायक म्हणून पुढे आलेल्या नीलेश साबळेचा ‘नवरा माझा भवरा’, मकरंद अनासपुरेचा ‘दणक्यावर दणका’, अंकुश चौधरी-पुष्कर श्रोत्रीचा ‘संशयकल्लोळ’, उमेश कामतचा ‘परिस’ आदी चित्रपट येऊन गेले. येत्या १९ एप्रिलला रामनवमीच्या मुहूर्तावर आशुतोष राणाचे मराठीत आगमन होत असलेला ‘येडा’, मृणाल कुलकर्णीचे दिग्दर्शन क्षेत्रात पर्दापण करणारा ‘प्रेम म्हणजे प्रेम असते’, वेगळ्या विषयाची हाताळणी केलेला तृप्ती भोईरचा ‘टूरिंग टॉकीज’, ‘चिंटू २’, ‘कुरुक्षेत्र’ असे जवळपास सात चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. मात्र, आधीच्या शुक्रवारी (१२ एप्रिलला) एकही मराठी चित्रपट प्रदर्शित का झाला नाही, त्याचे कोडे उलगडत नाही.
समन्वयाचा व माहितीचा अभाव, चढाओढीने फायदा कोणाचाच होत नाही उलट नुकसान होत आहे. एकाच वेळी इतके चित्रपट प्रदर्शित झाल्यास जेमतेम एखाद-दुसरा चित्रपट पाहण्याचे बजेट असलेला मराठी प्रेक्षक कोणता चित्रपट पाहणार, असा मुद्दा उपस्थित केला जातो. त्यामुळे चांगल्या चित्रपटाचेही नुकसान होते. मराठी चित्रपटाचा आशय, विषयांचे वेगळेपण आणि नवनवीन प्रयोग करण्याच्या कल्पकतेचा गौरव केला जातो. ‘देऊळ’ व त्यानंतर ‘धग’ चित्रपटाने राष्ट्रीय पातळीवर मराठीची पताका फडकावली, असे चित्र एकीकडे असतानाच समन्वयाच्या अभावाने वेगळेच चित्र पुढे येते आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is it hara kiri of marathi film producers
Show comments