पुणे : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असताना कोरेगाव पार्क, मगरपट्टा, वडगाव शेरी, चिंचवड, लवळे या भागांमध्ये इतर भागांच्या तुलनेत कमाल तापमानाचा पारा चढा आहे. तर या भागांच्या तुलनेत शिवाजीनगर, पाषाण येथील कमाल तापमान साधारणपणे दोन अंश सेल्सियस कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरेगाव पार्क, मगरपट्टा, वडगाव शेरी, चिंचवड, लवळे या भागांमध्ये उष्णतेचे नागरी बेट (अर्बन हीट आयलंड) तयार झाले आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने हवामान विभागाकडून अभ्यास करण्याचे नियोजन आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील हवामानात चढ-उतार होत असल्याचे चित्र आहे. एप्रिल सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे तापमान कमी होत होते. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुन्हा तापमान वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच दिवस आणि रात्रीच्या तापमानात चढ-उतार होत आहेत. तापमानात वाढ झाल्याने नागरिकांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हवामान विभागाच्या गेल्या काही दिवसांतील आकडेवारीचा आढावा घेतला असता कोरेगाव पार्क, वडगाव शेरी, मगरपट्टा, चिंचवड, लवळे या परिसरात तापमान जास्त असल्याचे दिसून येते.

हेही वाचा – पुणे: मालमत्ता कराची देयके गेल्यावर्षीप्रमाणेच! पाणीपट्टीत १५ टक्के वाढ; कर रकमेत अल्पवाढीची शक्यता

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार बुधवारी (१९ एप्रिल) कोरेगाव पार्क येथे ४३.३, वडगाव शेरी येथे ४१.९, चिंचवड येथे ४१.५, लवळे येथे ४०.९, मगरपट्टा येथे ४०.८, शिवाजीनगर येथे ४०, एनडीए येथे ३९.६, पाषाण येथे ३९.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. १२ एप्रिल रोजी कोरेगाव पार्क येथे ४१.९, वडगाव शेरी येथे ४१, चिंचवड येथे ४०.१, मगरपट्टा येथे ३९.८, पाषाण येथे ३८.९, शिवाजीनगर येथे ३८.८ अंश सेल्सियस तापमान होते. ८ एप्रिलला कोरेगाव पार्क येथे ३७.६, वडगाव शेरी येथे ३५.६, चिंचवड येथे ३५.७, मगरपट्टा येथे ३५, पाषाण येथे ३३.९, शिवाजीनगर येथे ३४.९, एनडीए येथे ३४.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर ३ एप्रिलला वडगाव शेरी येथे ३७.४, लवळे येथे ३७.७, कोरेगाव पार्क येथे ३६.६, चिंचवड येथे ३६.४, मगरपट्टा येथे ३६.१, पाषाण येथे ३४.४, शिवाजीनगर येथे ३५.६, एनडीए येथे ३५.२ अंश सेल्सियस तापमान होते.

पुण्यात सरासरी तापमान चाळीस अंश सेल्सियस असते. चाळीस अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान झाल्यास काळजी घ्यायला हवी. पुणे जिल्ह्याची भौगोलिक रचना वेगळी आहे. जिल्ह्यात डोंगरदऱ्या, जंगल, जलाशय, शहर, ग्रामीण भाग आहे. वडगाव शेरी, कोरेगाव पार्क, लवळे इथे जास्त तापमान का आहे, हा अभ्यास करण्यासारखा भाग आहे. ‘उष्णतेचे नागरी बेट’ (अर्बन हीट आयलंड) हा घटक दिवसाच्या तापमानापेक्षा रात्रीच्या तापमानाशी निगडित आहे. ‘उष्णतेचे नागरी बेट’ तयार झाली आहेत का, हे अभ्यासाअंती कळेल. त्यामुळे या संदर्भात अभ्यास करण्याचे नियोजन आहे. तापमान वाढण्यासाठी लोकसंख्येची घनता, वाहतूक कोंडी, मोठ्या प्रमाणात बांधकामे, कार्बन उत्सर्जन, काँक्रिटीकरण असे अनेक घटक कारणीभूत असतात. उष्णतेच्या लाटेसंदर्भात हवामानशास्त्र विभाग काय करत आहे याची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे. प्रशासनासह मिळून ही माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हवामानशास्त्र विभाग प्रयत्नशील आहे, असे हवामानशास्त्र विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी सांगितले.

हेही वाचा – पुणे : मोटारचालकांकडे बतावणी करून ऐवज लांबविणारे तामिळनाडूतील चोरटे गजाआड; आठ गुन्हे उघड

उष्णतेचे नागरी बेट म्हणजे काय?

उष्णतेचे नागरी बेट म्हणजे शहरातील काही भागांमध्ये दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत आढळते. ही तफावत प्रामुख्याने रात्री अधिक जाणवते. कारण इमारती, रस्ते, पदपथांनी शोषून घेतलेली उष्णता सूर्य मावळल्यानंतरही कायम राहून रात्रीही अधिक तापमान जाणवते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is koregaon park magarpatta an urban island of heat study planning by meteorological department pune print news ccp 14 ssb