पुणे : मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आयोगाच्या कामकाजात शासनाच्या वाढत्या हस्तक्षेपाला कंटाळून निरगुडे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. यापूर्वी प्रा. डॉ. संजीव सोनवणे, ॲड. बालाजी किल्लारीकर आणि प्रा. लक्ष्मण हाके यांनी राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या आयोगाच्या बैठकीत निरगुडे यांनी राजीनामा देण्याबाबत सुतोवाच केले होते.
राज्य सरकारने आयोगाला मराठा समाजाचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार आयोगाने कामकाज सुरू केले आहे. मात्र, मराठा समाजाबरोबरच राज्यातील सर्वच समाजांचे सर्वेक्षण करण्यावरून आयोगात दोन गट पडले आहेत. या मुद्द्यावरून १ डिसेंबरच्या बैठकीत वादही झाले. त्यामुळे ॲड. किल्लारीकर यांनी राजीनामा दिला. तसेच शासनाचा वाढता हस्तक्षेप, ओबीसी आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात दाखल याचिकेत आयोगाचे शपथपत्र दाखल करण्यास महाराष्ट्र राज्याच्या महाधिवक्त्यांनी केलेला विरोध यामुळे प्रा. हाके यांनी राजीनामा दिला आहे. आता शासनाच्या हस्तक्षेपाला कंटाळून आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी देखील राजीनामा देण्याची तयारी केली असल्याचे सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
हेही वाचा : ‘मुळशी पॅटर्न’ चर्चेत! शेत जमिनीच्या वादातून मध्यप्रदेशातून आणली चार पिस्तुले
दरम्यान, १ डिसेंबरच्या बैठकीत ॲड. किल्लारीकर यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्यावर निरगुडे यांनी देखील राजीनामा देण्याबाबत भाष्य केले होते. शासनाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊन निरगुडे हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. शिंदे, फडणवीस, पवार मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री, मराठा आरक्षणाबाबतच्या सल्लागार मंडळाचे प्रमुख यांच्या अनावश्यक हस्तक्षेप होत असल्याची चर्चा आहे. निरगुडे यांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२४ मध्ये संपणार आहे.