कात्रजच्या नव्या बोगद्याजवळ शिंदेवाडी येथे पुणे-सातारा रस्त्याच्या खालून जाणारे दोन मोठे ओढे आता पूर्णपणे बुजवण्यात आले आहेत. त्याजागी लहान पाईप टाकून पाणी वाहून जावे यासाठी केविलवाणा प्रयत्न केला आहे.. महामार्गाचे इतके मोठे काम करताना ‘रिलायन्स इन्फ्रा’ सारख्या मोठय़ा कंपनीला जलवहनशास्त्र (हायड्रॉलॉजी) लक्षात आले नाही का? आणि लक्षात आले असेल तर रस्त्याखालून जाणारे भले मोठे ओढे कुठे गेले, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मुंबई-बंगळुरू रस्त्यावर पुण्याजवळील शिंदेवाडी येथे तीन आठवडय़ांपूर्वी (६ जून) पावसानंतर महामार्गावरच पाण्याचे प्रचंड लोट वाहिले. त्या पुरात वाहने वाहून गेली. एक महिला व तिच्या चौदा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. बेकायदेशीर डोंगर फोडल्यामुळे खाली आलेला राडारोडा जबाबदार असल्याचे उघड झाले. याबाबत किसन राठोड व त्याच्या भावाविरुद्ध गुन्हाही दाखल झाला आहे. यात आणखी एक महत्त्वाची बाब विचारात घेतली नाही. ती म्हणजे- रस्त्याचे चार पदरीकरण, उड्डाणपूल बांधताना बुजवलेले नैसर्गिक प्रवाह! या बदलांमुळे तेथील पाणी वाहून जाण्याची

मोठे ओढे बुजवून असे पाईप आले आणि असलेले पूलही बुजत चालले.

नैसर्गिक व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. पाणी रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जाण्याचे पूर्वीचे मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे एकाच बाजूला पाणी तुंबते, ते रस्त्यावर येते.
शिंदेवाडी येथे पुणे-सातारा रस्त्याच्या पश्चिमेला डोंगर, त्यातून खाली येणारे नैसर्गिक ओढे अशी भूरचना आहे. हे ओढे रस्त्याच्या खालून पूर्व दिशेला वाहत जायचे. यापैकी रामदरा व तळदरा या दोन खोऱ्यातून मोठे ओढे निघतात. रामदरा खोऱ्यातून जेथून ओढा खाली यायचा, तिथेच नवे बोगदे खणण्यात आले आहेत. शिंदेवाडीच्या ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदऱ्याचे खोरे सुमारे चारशे एकरांचे आहे. पावसाळ्यात तेथून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहते. ते ओढय़ावाटे पुणे-सातारा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाते. त्यावर मोठा पूल होता. त्यातून उन्हाळ्यात गवत भरलेले ट्रक पलीकडे जायचे. आता मात्र त्याची खोली निम्मीसुद्धा उरलेली नाही. तो दुर्घटनेच्या वेळी राडारोडय़ाने भरलेला होता.
तळदऱ्यातून निघणाऱ्या ओढय़ांची स्थिती याहून भयंकर आहे. या खोऱ्याचा विस्तार ५०० ते ६०० एकरांचे आहे. तिथे पूर्वी तासभर पाऊस पडला तरी ओढे तुडुंब भरायचे. हे पाणी रस्त्याखालून वाहून जाण्यासाठी दोन मोठे ओढे व त्यावर मोठय़ा मोऱ्या (पूल) होत्या. त्यामुळे पाण्याला कधीच अडथळा आला नव्हता. आता रस्त्याच्या कामात दोन्ही मोऱ्या पूर्णपणे बुजवण्यात आल्या आहेत. एके ठिकाणी पाणी जाण्यासाठी रस्त्याखालून तीन लहान पाईप टाकलेले आहेत. दुर्घटनेच्या दिवशी त्यात राडारोडा जाऊन बसला व काही मिनिटांत पाणी तुंबले. पाण्याला मार्गच नसल्याने ते वाट्टेल तिथे शिरले.
या ठिकाणचे इतरही ओढे रस्ता बांधताना बुजविण्यात आले. या रस्त्याचे पुणे ते सातारा दरम्यानचे १४० किलोमीटरचे काम ‘रिलायन्स इन्फ्रा’ कडे आहे. त्यांच्या वतीने इतर कंपन्या काम करत असल्या तरी करारानुसार बांधकामाची जबाबदारी ‘रिलायन्स’ कडेच जाते. हे काम करताना तिथले जलवहनशास्त्र विचारात न घेता नैसर्गिक ओढे कसे बुजवले, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मग कारवाई करताना या कंपनीला मोकळे का सोडले गेले, असाही प्रश्न विचारला जात आहे.
ओढे बुजवल्याच्या चौकशीसाठी अधिकारी
शिंदेवाडी दुर्घटनेची दंडाधिकारी चौकशी प्रांत अधिकारी संजय असवले करत आहेत. शिंदेवाडी येथे ओढे, पाण्याचे प्रवाह यांना काय बाधा आली आहे, हे शोधण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती म्हणून जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजीराव राजळे यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या चौकशीत याबाबत गोष्टी उघड होतील, अशी आशा आहे.