भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाचा गेल्या कित्येक महिन्यांपासून असलेला तिढा सुटण्याच्या मार्गावर असून शहराध्यक्षपदासाठी खासदार गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक सदाशिव खाडे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे वृत्त आहे. याबाबतची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत लवकरच होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही तत्कालीन नितीन गडकरी यांचे समर्थक एकनाथ पवार यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. वेगवेगळ्या कारणांनी सतत वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या पवारांची मुदत मागील वर्षीच संपली. तथापि, पुढील अध्यक्षपदाचा निर्णय होत नसल्याने आतापर्यंत त्यांना अघोषित मुदतवाढ मिळाली. पुन्हा शहराध्यक्ष होण्यास पवार तीव्र इच्छुक आहेत. तथापि, आपल्या नावाला तीव्र विरोध असल्याची जाणीव असल्याने त्यांनी नामदेव ढाके यांचा पर्याय तयार ठेवला आहे. ढाके यांच्यासाठी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आग्रही आहेत. अ‍ॅड. सचिन पटवर्धन, बाळासाहेब गव्हाणे यांनी स्वत:च्या ताकदीप्रमाणे फिल्डींग लावली. माजी नगरसेविका उमा खापरे यांचे नाव स्पर्धेत आणण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, स्थानिक पातळीवर काम करण्यापेक्षा प्रदेशावर जाण्यास त्यांची पसंती आहे. मागील वेळी मुंडे गटातील तीव्र मतभेद व कुरघोडय़ांमुळे पवारांची लॉटरी लागली होती. त्यातून धडा घेत आता एकाचेच नाव देण्याची सूचना मुंडे यांनी समर्थकांना केली होती. त्यानुसार, बरेच प्रयत्न झाले. मात्र, तीव्र इच्छुक असलेल्या गव्हाणे व खाडे यांच्यात अनेकदा प्रयत्न करूनही एकमत झाले नाही. अखेर, मुंडे यांचे अतिविश्वासू, अडचणीच्या काळातही त्यांच्यासमवेत राहिलेले खाडे यांच्या अनुभवाचा व वयाचा विचार करून त्यांच्या नावाला पसंती देण्यात आल्याचे समजते. खाडेंनी दोन वेळा सरचिटणीसपद भूषविले आहे. पिंपरी शिक्षण मंडळावर त्यांची वर्णी लागली होती. याशिवाय, युतीची सत्ता असतानाही ते महामंडळावर होते. मुंडेंची सतत ‘कृपादृष्टी’ होत राहिल्याने या ना त्या पदावर खाडे कार्यरत राहिले आहेत. आताही त्यांच्या कर्तृत्वाविषयी सर्वाच्याच मनात शंका असताना ‘मुंडे समर्थक’ या एकाच निकषावर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे. याविषयी अधिकृतपणे कोणीही बोलण्यास तयार नाही. मात्र, खाडे यांच्याशिवाय दुसरे नाव मुंडे यांच्याकडून येणार नसल्याचे पक्षातच खात्रीशीरपणे सांगितले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा