रस्तोरस्ती पडलेल्या खड्डय़ांची दुरुस्ती करणे पाऊस सुरू असल्यामुळे सध्या शक्य होत नसल्याची वस्तुस्थिती शहरात असून तात्पुरता उपाय म्हणून आता मोठय़ा खड्डय़ांमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम महापालिकेतर्फे दिवसरात्र सुरू आहे.
जोरदार पावसामुळे शहरातील बहुतेक सर्व छोटे-मोठे रस्ते उखडले असून अनेक रस्त्यांची तर चाळण झाली आहे. खड्डय़ांबाबत दोनच दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते आणि पुणेकरांकडूही मोठय़ा प्रमाणावर ओरड होत असल्यामुळे भर पावसातच खड्डे दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. सध्या खड्डय़ांची फक्त डागडुजी करण्याचे धोरण असून त्यासाठी रात्रीही कामे केली जात आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील. पावसात खड्डे दुरुस्तीचे काम केले, तर ते वाया जाईल ही वस्तुस्थिती असल्यामुळे तूर्त मोठय़ा खड्डय़ांमुळे जे हादरे वाहनचालकांना बसत आहेत ते कमी करण्यासाठी डागडुजी केली जात असल्याचे सांगण्यात आले.
शहरात विविध भागात जे मोठे खड्डे पडले आहेत त्यात पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती पथ विभागाचे प्रमुख प्रमोद निरभवणे यांनी बुधवारी दिली. मित्रमंडळ चौक, सेनापती बापट रस्ता, विमाननगर, बिबवेवाडी, वडगाव शेरी यासह मोठे खड्डे पडलेली तीस ठिकाणे या कामासाठी निश्चित करण्यात आली आहेत. ही तात्पुरती व्यवस्था आहे. पेव्हिंग ब्लॉकमुळे  जे हादरे बसत आहे ते कमी होतील, असेही ते म्हणाले. महापालिकेचा पथ विभाग तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि नेहरू योजना अशा तिहेरी व्यवस्थेतून शहरात खड्डे दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

Story img Loader