चैत्र मास सुरू झाल्यानंतर सृष्टीचे रूप पालटण्यास सुरुवात होते आणि निसर्गालाही वसंत ऋतूची चाहूल लागते. दिवसभराच्या कडक उन्हानंतर तिन्हीसांजेला होणारी वसंत व्याख्यानमाला ही श्रोत्यांचे वैचारिक भरणपोषण करण्यासाठी उत्सुक असते. विचारांची पक्की बैठक असलेल्या वक्त्याकडून एखाद्या विषयाची माहिती जाणून घेऊन जाणते श्रोते घडविण्याचे काम व्याख्यानमालांनी केले. आता करमणुकीची आणि माहिती सहजगत्या उपलब्ध करून देणारी इतकी माध्यमे विकसित झाली, की व्याख्यानमालांची खरोखरच गरज उरली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो खरा. पण, त्याहीपेक्षा माणसाच्या उत्सवप्रियतेला ज्ञानार्जनाची जोड देऊन त्याला समंजस आणि सुजाण करण्यासाठी व्याख्यानमाला झाल्या पाहिजेत, हे या प्रश्नाचे उत्तर कालसुसंगत राहिले आहे का, हा शोध घेणे अधिक महत्त्वाचे आहे.

पुण्यातील वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वसंत व्याख्यानमालेचे यंदा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष. त्या निमित्ताने तर उपरोल्लेखित प्रश्नाची चर्चा होणे अधिक औचित्यपूर्ण. देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना बलशाली आणि वैचारिकदृष्ट्या समृद्ध पिढी घडविण्याच्या उद्देशातून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी वसंत व्याख्यानमाला सुरू केली. त्याचे अनुकरण करून दीड शतकाच्या कालखंडात राज्यभरात ठिकठिकाणी व्याख्यानमाला सुरू झाल्या. राजकारण, समाजकारण, आर्थिक, इतिहास, साहित्य, संस्कृती, कायदा, आरोग्य, रंगभूमी, चित्रपट, संगीत अशा विविध विषयांवरील तज्ज्ञांची होणारी व्याख्याने ही जशी वक्त्यांना विचार परिपक्व करण्यासाठी उपयुक्त ठरतात, तसेच काही नवीन वैचारिक मंथन होऊन आपल्याही ज्ञानामध्ये भर पडल्याचा अनुभव श्रोत्यांना येत असतो.

टिळक स्मारक मंदिराच्या प्रांगणात दर वर्षी २१ एप्रिल ते २० मे अशी महिनाभर चालणारी वसंत व्याख्यानमाला आणि पूर्वी नारायण पेठेतील औदुंबर आळीतील गच्चीवर होणाऱ्या ‘मॅजेस्टिक गप्पा’ ही पुणेकरांसाठी वैचारिक मेजवानी असायची. काळाच्या ओघात ‘मॅजेस्टिक गप्पा’ बंद झाल्या, तरी श्रोत्यांना घडविणारी वसंत व्याख्यानमाला अजूनही कार्यरत आहे. इतकेच नव्हे, तर शहराचा विस्तार होत गेला, तसे शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातही पाच दिवसांची वसंत व्याख्यानमाला सुरू झाली. साधना कला मंचाच्या वतीने डहाणूकर काॅलनी परिसरात, तर साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने नाना पेठेमध्ये पाच दिवसांच्या वसंत व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर सहकारनगर परिसरातील सहजीवन व्याख्यानमाला आणि सिंहगड रस्त्यावरील स्वानंद व्याख्यानमाला त्या त्या भागातील श्रोत्यांना पर्वणी ठरतात. महात्मा जोतिराव फुले व्याख्यानमाला आणि हडपसर भागातील राम मनाेहर लोहिया व्याख्यानमाला श्रोत्यांना समृद्ध करतात.

गीतरामायणाची सप्तदशकपूर्ती यंदाच्या रामनवमीला झाली. सत्तर वर्षांपूर्वी गीतरामायणाचे पहिले गीत आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित झाले, तेव्हा घरामध्ये रेडिओ आहे म्हणजे तालेवार कुटुंब अशी गणना होत होती. नंतरच्या काळात दूरचित्रवाणी माध्यम आले. दूरचित्रवाणी रंगीत झाला. आता तर इंटरनेट आणि मोबाइल क्रांतीमुळे करमणुकीची माध्यमे त्याचप्रमाणे विकसित झालेली समाज माध्यमे माणसाजवळ आणि अगदी त्याच्या हातामध्ये आली. अशा वेळी व्याख्यान ऐकायला कोण जातो, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण, आधुनिक माध्यमे माहिती देतात. ज्ञान संपादन करायचे असेल, तर उत्तम वाचन आणि श्रवणाला पर्याय नाही. हे वैचारिक भरणपोषण व्याख्यानमाला करू शकतात.

अर्थात, व्याख्यानमालांनाही कात टाकावी लागेल. ती लोकाभिमुख कशी होईल, यासाठी आता संयोजकांना प्रयत्न करावे लागतील. व्याख्याने ऐकण्यासाठी येणारे श्रोते बहुतांश ज्येष्ठ नागरिक असतात, हे दृश्य बदलण्याची आवश्यकता आहे. युवा पिढीच्या दैनंदिन जगण्याशी निगडित, बदलत्या मध्यमवर्गाच्या आयुष्यातील अनेक ताण्याबाण्यांची मांडणी करणारे, तसेच सुसंगत राजकीय-सामाजिक विषय आणि अभ्यासू वक्त्यांची निवड यासाठी क्रमप्राप्त ठरेल. हा कटाक्ष ठेवला तर, व्याख्यानमालांचे ज्ञानसत्र अविरत सुरू राहील.

काही वर्षांपूर्वीपर्यंत टिळक स्मारक मंदिराच्या प्रांगणात होणाऱ्या वसंत व्याख्यानमालेमध्ये वाऱ्याची येणारी झुळूक आणि मंडपाजवळ असलेल्या झाडावरील आंबे क्वचितप्रसंगी थेट व्यासपीठावर येऊन पडण्याचे प्रसंग, हा त्यातील ‘वसंता’चाही अनुभव होता! पण, गेल्या काही वर्षांपासून ही व्याख्यानमाला टिळक स्मारक मंदिराच्या प्रेक्षागृहात होत असल्याने व्याख्यानमालेतील ‘वसंत’ हरपला, अशी जाणकार श्रोत्यांची भावना झाली होती. अर्थात, विषयांमधील ‘वसंत’ पुन्हा बहरू दे, ही मनीषा मात्र पुणेकर बाळगून आहेत आणि वसंत व्याख्यानमालेमध्ये आपले व्याख्यान झाले पाहिजे, अशी अभ्यासकांचीही इच्छा असल्याने, हा ‘विचार वसंत’ शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात आणखी बहरेल, अशी अपेक्षा!

vidyadhar.kulkarni@expressindia.com

 तुम्हीही मांडा मत

व्याख्यानमाला संदर्भहीन होत आहेत, की अजूनही त्यांचे सुसंगत्व कायम आहे? तुम्हाला काय वाटते? जरूर कळवा. ई-मेल :lokpune4@gmail.com