पुणे : सिंहगड रोडसहित शहरातील विविध भागांत जुलै महिन्यात पूरस्थिती निर्माण का झाली होती, याचे कारण गुलदस्त्यातच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही पूरस्थिती का तयार झाली याचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीने दिलेला अहवाल प्रसिद्ध करण्याची गरज नाही, अशी अजब भूमिका महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी घेतली आहे.

जुलै महिन्यात सिंहगड रोडवरील एकता सोसायटीसह आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. यामुळे ३०० हून अधिक लोक अडकले होते. अचानकपणे रात्रीच्या वेळी सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने हाहाकार माजला होता. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या भागात जाऊन पाहणी केली होती. या भागात अचानकपणे ही परिस्थिती का निर्माण झाली, याची चौकशी करण्याच्या सूचना या नेत्यांनी केल्या होत्या.

हेही वाचा – पुणे : महाविद्यालयाच्या आवारातच युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा

जुलै महिन्यातील पावसामुळे सिंहगड रोडसह शहरातील विविध भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीचे कारण शोधून काढून पुढील काळात अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करण्यासाठी पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी २६ जुलैला चार सदस्यांची समिती नेमली होती. यामध्ये अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, दिनकर गोजारी, बिपीन शिंदे यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता सुनंदा जगताप यांचा समावेश होता. या समितीने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आपला अहवाल पालिका आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे.

समितीच्या सदस्यांनी अभ्यास करून तयार केलेला हा अहवाल शहराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो पालिका प्रशासनाने महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली होती. समितीचे सदस्य हा अहवाल देत नसून पालिका आयुक्तांनीच आता ही माहिती संकेतस्थळावर टाकावी, अशी भूमिका वेलणकर यांनी मांडली होती. याबाबत पालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी मात्र हा अहवाल प्रसिद्ध करण्याची गरजच काय? अशी भूमिका घेतली आहे.

हेही वाचा – Pune Metro : पुणे मेट्रोच्या उद्घाटनावरून महाविकास आघाडी आक्रमक, दिला ‘हा’ इशारा; पुण्यात राजकारण तापलं

एकतानगरीमध्ये आलेल्या पुराच्या कारणांचा अभ्यास करावा, यासाठी ही समिती नेमली होती. ही काही चौकशी समिती नव्हती. त्यामुळे या समितीचा अहवाल जाहीर करण्याची आवश्यकता नाही. या अहवालाचा मी अभ्यास करून गरजेनुसार प्रसारमाध्यमांना त्याची माहिती देईन. – डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका

अतिपावसानेच ही पूरस्थिती

जुलै महिन्याच्या अखेर सिंहगड रोडवरील एकतानगरी भागात आलेला पूर हा अतिवृष्टीमुळेच आला होता, असे या अहवालातून समोर आले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले. मात्र याच दिवशी जलसंपदा विभागाने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्याबाबत आयुक्तांनी काहीही बोलण्यास नकार दिला.