पुणे रेल्वे स्थानक परिसराच दोन महिन्यांपूर्वी एक गतिमंद मुलगा आजारी अवस्थेत पोलिसांना सापडला. त्यांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान एकदा तो पळून गेला, पुन्हा लगेचच सापडला. आता तो आजारातून बरा झाला खरा, पण पालक किंवा नातेवाइकांबाबत माहिती नाही. तोसुद्धा स्वत:विषयी काही सांगू शकत नाही.. रुग्णालय प्रशासन पोलिसांना म्हणते,‘त्याला घेऊन जा.’ पोलीस म्हणतात,‘आम्ही त्याचे काय करू?’ पोलिसांनी विशेष मुलांसाठी असणाऱ्या संस्थांकडे चौकशी केली, पण त्याला दाखल करून घ्यायला संस्था तयार नाहीत.. या मुलाला कुठे ठेवायचे हा प्रश्न असून, काही व्यवस्था होईपर्यंत ससून रुग्णालय हाच त्याचा आसरा बनला आहे!
हा प्रश्न केवळ त्या एका मुलाचा नाही, तर अशी सहा मुले कोणताही आजार नसताना ससून रुग्णालयात मुक्कामी आहेत. कारण एकच की, त्यांची जबाबदारी घ्यायला कोणीच तयार नाही. या मुलांच्या देखरेखीसाठी रुग्णालयातर्फे एक अटेंडंट, तर बाल सुधारगृहातर्फे दोन अटेंडंट्स ठेवण्यात आले आहेत. जोपर्यंत इतर कुठे सोय होत नाही, तोपर्यंत या मुलांना रुग्णालयातच राहावे लागत आहे; तसेच रुग्णालयाच्या सहा खाटा व ते अटेंडंटही अडकून पडले आहेत.
याबाबत ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. डी. जी. कुलकर्णी म्हणाले, ‘‘या सहाही मुलांना कोणताही मोठा आजार नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची सध्या आवश्यकता नाही. या मुलांना बाह्यरुग्ण विभागाद्वारे औषधोपचार देता येतील. परंतु, त्यांना कुठे ठेवायचे याबद्दल रुग्णालयाला काहीही आदेश मिळालेले नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करून ठेवावे लागत आहे. बालसुधारगृह किंवा बाल कल्याण केंद्रात या मुलांची सोय करता येऊ शकेल. मात्र, या मुलांना कुठे हलवावे याबाबतचे आदेश बालकल्याण समितीकडून येणे आवश्यक आहे. त्याशिवाय रुग्णालय प्रशासन कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.’’
बंडगार्डन ठाण्याचे निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले, ‘‘पुणे स्टेशन परिसरात सापडलेल्या मुलाची राहण्याची सोय करण्यासाठी पोलिसांनी बरेच प्रयत्न केले. शहरातील विशेष मुलांसाठी असणाऱ्या संस्था व समाजकल्याण खात्याच्या आयुक्तांकडेही संपर्क साधला, पण या मुलाच्या राहण्याची सोय होण्यास तयार नाही. ससून रुग्णालयाच्या प्रशासनाने या मुलास घेऊन जाण्यास पोलिसांना सांगितले गेले. त्याची राहण्याची व्यवस्था काय करायची, असा प्रश्न आमच्यापुढे आहे. सध्या एखाद्या अनाथ आश्रमात त्याची सोय होते का, याची माहिती घेण्यात येत आहे.’’

Story img Loader