राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी विश्व साहित्य संमेलन घ्यावे की नाही यासंदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शक समितीची पुण्यामध्ये बैठक होणार आहे. विश्व साहित्य संमेलनासाठी लंडन येथील महाराष्ट्र मंडळाने निमंत्रण दिले आहे.
कॅनडाच्या टोरान्टो येथे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विश्व साहित्य संमेलन होणार होते. मात्र, निधी संकलनाअभावी हे संमेलन रद्द करण्यात आल्याची घोषणा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी पुण्यामध्ये केली होती. मात्र, हे रद्द झालेले संमेलन आर्थिक वर्ष संपण्याआधी होईल, असेही त्यांनी त्या वेळी सांगितले होते. आता साहित्य महामंडळाचे कार्यालय एक एप्रिलपासून आगामी तीन वर्षांसाठी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे येत आहे. त्यामुळे विश्व साहित्य संमेलनाबाबतचा निर्णय महामंडळाच्या नव्या पदाधिकाऱ्यांना घ्यावयाचा आहे.
राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. अशा परिस्थितीमध्ये विश्व साहित्य संमेलन घ्यावे की नाही याविषयी साहित्य महामंडळ सदस्यांमध्येच मतमतांतरे आहेत. या पार्श्वभूमीवर साहित्य महामंडळाच्या मार्गदर्शक समितीची १५ एप्रिलनंतर पुण्यामध्ये बैठक होणार आहे. त्यामध्येच याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
आर्थिक वर्ष संपण्याआधी विश्व साहित्य संमेलन घेण्याची शक्यता मावळली असल्याचे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी सांगितले. याबाबत आता पुण्याचे पदाधिकारी निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर, साहित्य महामंडळाचे कार्यालय एक एप्रिलपासून पुण्यात येत असून त्यानंतर महामंडळाच्या मार्गदर्शक समितीच्या होणाऱ्या बैठकीमध्ये विश्व साहित्य संमेलनाविषयीचा निर्णय होणार असल्याची माहिती महामंडळाच्या नूतन अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली. डॉ. माधवी वैद्य, प्रा. मिलिंद जोशी, सुनील महाजन, कौतिकराव ठाले-पाटील, प्रा. उषा तांबे आणि मनोहर म्हैसाळकर यांचा या मार्गदर्शक समितीमध्ये समावेश आहे.