शाळेत जाते म्हणून दहावीत शिकणारी मुलगी मित्रासोबत फिरायला गेली. पण, घरी येण्यास उशीर झाल्यामुळे तिने आई-वडिलांना चक्क अपहरण झाल्याचे सांगितले. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून घरी आल्याचे सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पण, चोवीस तासांतच पोलिसांनी हा सर्व बनाव असल्याचे उघडकीस आणले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुडमधील शास्त्रीनगर येथे राहणारी पंधरा वर्षांची मुलगी शाळेत जाते म्हणून मित्रासोबत फिरायला गेली.  दिवसभर फिरल्यानंतर रात्री घरी येण्यास उशीर झाला. तिच्यासोबत जाणाऱ्या मुली शाळेतून आल्यानंतरही आपली मुलगी कशी आली नाही म्हणून वडिलांनी चौकशी केली असता ती शाळेत आली नसल्याचे समजले. त्या मुलीला घरी आल्यानंतर पालकांनी विचारणा केल्यानंतर तिने अपहरणाचा बनाव रचला.
एका व्यक्तींने आपल्याला जबरदस्तीने मोटारीत बसवून पळवून नेले. पण, त्यांची नजर चुकवून स्वत:ची सुटका करून पळून आल्याचे तिने घरी सांगितले. त्यामुळे तिच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करून घ्यावा म्हणून दबाव आणला. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता मुलीने हा सर्व बनाव रचल्याचे आढळून आले. याप्रकरणी मुलीचा व तिच्या वडिलांचा जबाब नोंदविण्यात आला असून मुलीसह मित्रालाही समज देण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक रवींद्र फड यांनी दिली.