पुणे : पुण्यात पकडलेल्या ‘आयसिस’च्या दहशतवाद्यांना मुंबई, पुणे, तसेच गुजरातमधील प्रमुख शहरात बाँम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला होता. कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील जंगात त्यांनी बाँम्बस्फोटाची चाचणी केली होती. पुण्यातील कोंढवा भागात त्यांनी बाँम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एनआयएने मुंबईतील विशेष न्यायालयात चार दहशतवाद्यांविरुद्ध तिसरे पुरवणी आरोपपत्र नुकतेच दाखल केले. मोहम्मद शहानाझ आलम, रिजवान अली, अब्दुलाह शेख, तलाह लियाकत खान अशी आरोपपत्र दाखल केलेल्यांची नावे आहे. एनआयएने यापूर्वी मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमिद खान (रा. रतलाम मध्यप्रदेश), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ अदिल उर्फ अदिल सलीम खान (रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगिर पठाण उर्फ अब्दुल कादीर, समीब नासीरउद्दीन काझी (दोघे रा. कोंढवा, पुणे), जुल्फीकार अली बडोदवाला उर्फ लालाभाई उर्फ लाला उर्फ सईफ, शमिल साकिब नाचन आणि आकिफ अतिक नाचन (रा. तिघेही रा. पडघा, ठाणे) यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

हेही वाचा…ठरलं! श्रीरंग बारणे मावळमधून भाजप नव्हे तर शिवसेनेकडूनच लढणार; म्हणाले, “मी आतापर्यंत शिवसेनेकडूनच…”

दहशतवाद्यांविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए), भारतीय स्फोटके कायदा, तसेच शस्त्र बाळगण्यासह विविध कलमांन्वये गु्न्हा दाखल करण्यात आला होता. मोहम्मद आलमला कोथरूड परिसरात दुचाकी चोरताना पोलिसांनी पकडले होते. त्यावेळी त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना पकडण्यात आले होते. तपासासाठी मोहम्मदला कोंढव्यात नेण्यात आले होते. तेव्हा तो पसार झाला होता. २ नोव्हेंबर २०२३ रोजी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्याला पकडले. त्यानंतर त्याला तपासासाठी एनआयएच्या ताब्यात देण्यात आले.

दहशतवादी महाराष्ट्रात आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करून तरुणांची माथी भडकावत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यांनी पुणे, मुंबईसह गुजरातमधील मोठ्या शहरात बाँम्बस्फोट घडविण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

हेही वाचा…पुणे जिल्ह्यात १०५१ बंदुकबाज

दहशतवाद्यांचा परदेशात संपर्क

दहशतवादी परदेशातील आयसिसच्या म्होरक्यांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते. एका ॲपचा वापर करून ते मुख्य सूत्रधाराच्या संपर्कात होते. सातारा जिल्ह्यातील एका वस्त्रदालनात दरोडा टाकून त्यांनी बाँम्बस्फोटाचे साहित्य खरेदी केले होते. कोंढव्यात त्यांनी बाँम्ब कसा तयार करायचा याबाबतचे प्रशिक्षण घेतले होते. कोल्हापूर, सातारा परिसरातील जंगलात त्यांनी नियंत्रित पद्धतीने बाँम्बस्फोट केले होते. त्यांनी शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isis terrorists caught in pune had planned to carry out bomb blasts in mumbai pune and gujarat pune print news rbk 25 psg