पुणे : ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) या साथरोगाचा धोका वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नायडू संसर्गजन्य रुग्णालयात विलगीकरणासाठी ५० रुग्णशय्या आणि ५ अतिदक्षता रुग्णशय्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर शहरातील सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> सात कोटींची रक्कम पालिकेकडे पडून? नक्की काय आहे प्रकार
महापालिकेच्या आरोग्य विभागाने राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एचएमपीव्हीचा संसर्गाबाबत खबरदारीची पावले उचलली आहेत. करोना साथीनंतर महापालिकेने भविष्यात संसर्गजन्य आजाराची साथ आल्यास नायडू रुग्णालयात रुग्णशय्यांची व्यवस्था केली आहे. त्यानुसार, त्यात नायडू संसर्गजन्य रुग्णालयात विलगीकरणासाठी ५० रुग्णशय्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. भविष्यात एचएमपीव्हीची साथ वाढल्यास त्यासाठी नायडू रुग्णालयांत विलगीकरणासाठी ३५० रुग्णशय्यांची व्यवस्था आहे. याचबरोबर खासगी रुग्णालयांची मदत घेऊन विलगीकरणासाठी ३ हजार ५०० रुग्णशय्यांची व्यवस्था करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
हेही वाचा >>> हनुमान टेकडीवर महाविद्यालयीन युवतीला लुटले- लुटमारीची तिसरी घटना
सर्दी, खोकल्याचे रुग्ण महापालिकेच्या दवाखान्यात आल्यास त्यांची स्वतंत्र नोंद ठेवण्याचे निर्देश महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिले आहेत. या रुग्णांची संख्या आणि त्यांची लक्षणे यावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे का आणि त्यांच्यात इतर कोणती लक्षणे दिसून येत आहेत का, याची तपासणी सातत्याने केली जाणार आहे. यामुळे रुग्णांची संख्या वाढल्यास आणि इतर लक्षणे दिसून आल्यास आरोग्य विभाग तातडीने पावले उचलू शकणार आहे.
एचएमपीव्हीबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्दी-खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. याचबरोबर खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांनाही सर्दी, खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. – डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका