पुणे : ‘चंद्रयान ३’ मोहिमेच्या यशानंतर आता भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून (इस्रो) सौर मोहिमेअंतर्गत सूर्याच्या अभ्यासासाठी ‘आदित्य एल १’ यान शनिवारी (२ सप्टेंबर) प्रक्षेपित केले जाणार आहे. या मोहिमेत सूर्याच्या अभ्यासासाठी समाविष्ट सात उपकरणांमध्ये आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राने विकसित केलेल्या ‘सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’चा (सूट) समावेश असून, या उपकरणाद्वारे सूर्याची अतिनील किरणे, तापमान इत्यादी घटकांचा अभ्यास केला जाणार आहे.
आदित्य एल १ मोहीम आणि सूट दुर्बिणीचे महत्त्व या बाबत सूट दुर्बीण विकसित करणाऱ्या ‘आयुका’च्या संशोधन गटातील वैज्ञानिक अधिकारी चैतन्य राजर्षी यांनी माहिती दिली. सूर्याच्या अभ्यासासाठीच्या मोहिमेची घोषणा इस्रोने २००८ मध्ये केली. आतापर्यंत नासा, युरोपियन स्पेस एजन्सी अशा मोजक्या देशांतील संशोधन संस्थांनी अंतराळातील सौर मोहिमा केल्या आहेत. त्यामुळे भारताच्या पहिल्या अंतराळ सौरमोहिमेत सूट ही दुर्बीण समाविष्ट असेल हे निश्चित झाल्यावर २०१३ पासून संशोधन आणि विकासाचे काम आयुकात सुरू करण्यात आले. इस्रोच्या सहकार्याने आयुकाचे प्रा. ए. एन. रामप्रकाश आणि प्रा. दुर्गेश त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली सूट दुर्बीण विकसित करण्यात आली.
हेही वाचा : गणेशमूर्ती विक्री दुकानांना परवाना सक्तीचा, अन्यथा…
या दुर्बिणीच्या आराखड्याचे काम आयुकात करण्यात आले, तर निर्मिती व चाचणी इस्रोमध्ये झाली. त्यासाठी आयुकाने अंतराळ मोहिमेसाठीच्या विशिष्ट गरजा असणारी प्रयोगशाळा इस्रोच्या बंगळुरू केंद्रात तयार केली. या दुर्बिणीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. या दुर्बिणीद्वारे सूर्याचे प्रकाश क्षेत्र (फोटोस्फेअर), सूर्याच्या बाहेरील थर (क्रोमोस्फेअर), सूर्याचे प्रभामंडल (कोरोना), सूर्याचे तापमान, अतिनील किरणे, ओझोन थरावर होणारा परिणाम अशा विविध घटकांचा अभ्यास करण्यात येईल. ही दुर्बीण अतिनील किरणांच्या २०० ते ४०० नॅनोमीटर श्रेणीमध्ये काम करणार आहे, असे राजर्षी यांनी सांगितले.
हेही वाचा : प्रवाशांसाठी खुशखबर! रेल्वे स्थानकावरच करा आता इलेक्ट्रिक वाहन चार्ज
सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर १५ कोटी किलोमीटर आहे. पृथ्वी आणि सूर्य यांचे गुरुत्वीय बल संतुलित राहतील असे पाच बिंदू (लॅग्रेजियन पॉईंट) आहेत. या ठिकाणांहून सूर्याचा अभ्यास करणे हे विशेष व महत्त्वाचे असते. त्यातील एल १ या बिंदूचा वापर आदित्य एल १ या मोहिमेत केला जाणार आहे. एल १ हा बिंदू पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटरवर आहे. आदित्य एल १ यान प्रक्षेपित केल्यानंतर साधारण १०९ ते १२८ दिवसांनी एल १ या स्थानी पोहोचण्याची अपेक्षा आहे.