पुणे : नासाच्या अंतराळ वेधशाळा आणि भारताच्या ॲस्ट्रोसॅटने एका मोठ्या कृष्णविवराभोवतीच्या तारकीय अवशेषांतून होणारे नाट्यमय उद्रेकांचा शोध घेतला आहे. कृष्णविवरामुळे एक तारा फुटून आता ते अवशेष दुसऱ्या ताऱ्याकडे जात असून, या शोधामुळे खगोलशास्त्रज्ञांना नवी दिशा मिळाली आहे.

आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्राने (आयुका) या बाबतची माहिती माहिती दिली. या संशोधनाचा शोभनिबंध नेचर या संशोधनपत्रिकेत नुकताच प्रसिद्ध झाला. नासाच्या चंद्रा, एचएसटी, एआयसीईआर, स्विफ्ट आणि इस्रोच्या ॲस्ट्रोसॅट या दुर्बिणींचा उपयोग संशोधनासाठी करण्यात आला. खगोलशास्त्रज्ञांनी २०१९मध्ये कृष्णविवराच्या जवळ येऊन गुरुत्वाकर्ष शक्तींमुळे नष्ट झालेल्या ताऱ्याचे संकेत पाहिले होते. त्या ताऱ्याचे तुकडे झाल्यावर ते अवशेष एका तबकडीच्या रुपात कृष्णविवराभोवती फिरू लागले.

हेही वाचा >>> तळेगाव टोलनाक्यावर तस्करी करुन आणलेले साडेचार कोटींचे सोने जप्त, महसूल गुप्तचर संचलनालयाची कारवाई

मात्र, काही वर्षांत ही तबकडी आता बाहेरून विस्तारली आहे. आता ती एका ताऱ्याच्या जवळ आली. हा तारा त्या तबकडीच्या अवशेषांवर दर ४८ तासांनी अशाप्रमाणे वारंवार आदळत आहे. या आदळण्याने ऊर्जावान क्ष किरणांचा स्फोट होत असल्याचे खगोलशास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे. गेल्या काही वर्षांत खगोलशास्त्रज्ञांनी विविध दीर्घिकांच्या केंद्रांमधून प्रचंड चमकदार अशा स्फोटांचा नवीन वर्ग शोधला आहे. तो केवळ क्ष-किरणांमध्ये आढळतो आणि अनेक वेळा पुनरावृत्त होतो. या घटना महाकाय कृष्णविवरांशी जोडल्या गेल्या आहेत. मात्र, हे उद्रेक कशामुळे झाले हे खगोलशास्त्रज्ञांना स्पष्ट झालेले नाही. या स्फोटांना ‘अर्ध-नियतकालिक स्फोट’ (क्वासी पिरिऑडिक इरप्शन्स) असे नाव देण्यात आले आहे.

हेही वाचा >>> केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना तालमीतील मित्र त्यांच्याच बंदोबस्तासाठी भेटतो तेव्हा…

ऑक्सफर्ड विद्यापीठाचे अँड्र्यू ममरी म्हणाले, की नियमित स्फोटांच्या उत्पत्ती समजण्यात मोठी प्रगती झाली आहे. ताऱ्याचा नाश झाल्यानंतर तबकडीचा दुसऱ्या ताऱ्याशी सामना होण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे असे स्फोट सुरू होण्यासाठी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. ॲस्ट्रोसॅट दुर्बीण अतिनील, क्ष किरणांच्या अभ्यासासाठी सक्षम आहे. या दुर्बिणीने क्ष किरणांचे स्फोट दर्शवले. भविष्यात एकाचवेळी क्ष किरण आणि तत्सम स्फोटांचा अतिनील निरीक्षणे, त्यांच्या स्वरुपांचा सखोल अभ्यास करता येईल, असे आयुकाचे प्रा. गुलाब देवांगन यांनी सांगितले.