लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: मेट्रो रेल्वेसाठी स्थलांतरित करण्यात आलेल्या शिवाजीनगर येथील धान्य गोदामाच्या बदल्यात उरुळी देवाची येथील गायरान जमिनीची जागा निश्चित करण्यात आली आहे. या जागेचा आरखडा अन्नधान्य वितरण विभागाकडून तयारही करण्यात आला आहे. मात्र, महसूल विभागाने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्याने तीन वर्षांपासून धान्य गोदामाच्या जागेचा तिढा कायम आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) करण्यात येणाऱ्या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी चिंचवड; तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) करण्यात येणारी हिंजवडी ते शिवाजीनगर या तिन्ही मेट्रो मार्गिका शिवाजीनगर येथे एकत्र येणार आहेत. या ठिकाणी बहुउद्देशीय वाहतूक केंद्र (मल्टिमोडल हब) प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेले शहराचे धान्य गोदाम तात्पुरते फुरसुंगी येथे खासगी जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे.

आणखी वाचा- चिंचवडमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेटिंग लावणारे पाच बुकी जेरबंद

धान्य गोदामासाठी कायमस्वरूपी जागा मिळण्यासाठी उरुळी देवाची येथील सुमारे १४ एकर गायरान जागा मंजूर करण्यात आली आहे. त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या फुरसुंगी येथे खासगी जागेत असलेल्या धान्य गोदामाचे जागेचे भाडे महामेट्रोकडून देण्यात येत आहे. करारानुसार त्याची मुदत तीन वर्षांपर्यंत आहे. त्यामुळे शिवाजीनगर येथून धान्य गोदाम स्थलांतरित केल्यापासून तीन वर्षांच्या आत शहर पुरवठा विभागासाठी जागा देणे आवश्यक आहे. त्यानुसार उरुळी देवाची येथे गोदामाचे बांधकाम होणे अपेक्षित होते.

आणखी वाचा- देशभरातील मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज पठण करू द्या, पुण्यातील दाम्पत्याची मागणी

शिवाजीनगर येथील धान्य गोदामाच्या जागेत सुमारे २४ हजार चौरस फुटांचे बांधकाम होते. तेवढे बांधकाम उरुळी देवाची येथील जागेत ‘महामेट्रो’ने करून देण्याची मागणी अन्नधान्य वितरण विभागाकडून करण्यात आली आहे. उरुळी देवाची येथील जागेसाठी महसूल विभागाला पुन्हा प्रस्ताव नुकताच पाठविण्यात आला आहे. -सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी

नेमकी समस्या काय?

धान्य गोदामासाठी कायमस्वरूपी जागा मिळत नाही, तोवर खासगी जागेतील धान्य गोदामाचे भाडे महामेट्रोने देण्याचे कबूल केले आहे. मात्र, धान्य गोदामासाठी कायमस्वरूपी जागा गोदाम ताब्यात घेतल्यापासून तीन वर्षांच्या आत मिळविण्याची अट महामेट्रोने घातली आहे. हे धान्य गोदाम महामेट्रोने तीन वर्षांपूर्वी ताब्यात घेतले असून, तेव्हापासून आतापर्यंत फुरसुंगी येथील खासगी जागेचे भाडे महामेट्रो देत आहे. मात्र, अद्यापही शासन स्तरावरून उरुळी देवाची येथील गोदामाच्या जागेबाबत निर्णय झालेला नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Issue of grain warehouse space remains pune print news psg 17 mrj
Show comments