मनुष्यबळ हा प्रत्येक उद्योगाचा कणा असतो. त्यामुळे त्या उद्योगाची वाढ होण्यास तेथील कार्यसंस्कृती अतिशय महत्त्वाची असते. पुण्यातील उद्योग क्षेत्रात अलीकडच्या काळात घडलेल्या दोन घटनांनी एकूणच येथील कार्यसंस्कृतीबाबत अतिशय गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. माहिती-तंत्रज्ञानासह सेवा क्षेत्रातील अनेक बहुराष्ट्रीय आणि देशातील मोठ्या कंपन्या पुण्यात आहेत. या कंपन्यांत काम करणाऱ्या लाखो मनुष्यबळाचे प्रश्न फारसे समोर येत नाहीत. मात्र, गेल्या वर्षी अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) इंडिया कंपनीत काम करणाऱ्या ॲना सेबास्टियन पेरायिल या सनदी लेखापाल तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर या कार्यसंस्कृतीचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला.
मोठ्या आयटी आणि सेवा कंपन्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन तुलनेने इतर क्षेत्रांपेक्षा जास्त असल्याने त्यांच्यावर येणारा मानसिक ताण नेहमीच दुर्लक्षित केला जातो. मानसिक आरोग्याकडे आपल्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही, हेही कदाचित यामागील कारण असावे. ॲनाच्या मृत्यूनंतर कार्यसंस्कृतीचा मुद्दा समोर आल्यानंतर समाजमाध्यमामध्ये त्यावर चर्चा झडल्या. प्रत्यक्षात त्यानंतर कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत.
हेही वाचा – पिंपरी : उद्योजकांमागे ‘एलबीटी’चे शुक्लकाष्ट, महापालिकेकडून ७२ हजार व्यापाऱ्यांना नोटिसा
आता इन्फोसिस कंपनीच्या पुण्यातील कार्यालयात काम करणाऱ्या भूपेंद्र विश्वकर्मा या तरुणाने राजीनामा देऊन चर्चेला तोंड फोडले आहे. भूपेंद्र याने हाताशी दुसरी नोकरी नसतानाही इन्फोसिसमधील नोकरी सोडली. यासाठी त्याने कार्यसंस्कृतीकडे बोट दाखविले आहे. त्याने नोकरी सोडण्यासाठी सहा प्रमुख कारणे दिली आहेत. त्यात आर्थिक प्रगतीची संधी नसणे, कामाचा जास्त बोजा, करिअरमध्ये पुढे संधी नसणे, ग्राहकांच्या अवास्तव अपेक्षा, काम करूनही त्याचे कौतुक न होणे आणि प्रादेशिकतावाद या मुद्द्यांचा समावेश आहे. भूपेंद्रच्या निमित्ताने आयटीतील कार्यसंस्कृतीची काळी बाजू समोर आली आहे.
कर्मचाऱ्यांनी आठवड्याचे किती तास काम करावेत, असा मुद्दाही आताचा वादाचा विषय बनला आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी हा मुद्दा पहिल्यांदा उपस्थित केला होता. त्यानंतर एल अँड टी कंपनीचे अध्यक्ष एस. एन. सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यात रविवारीही सुटी न घेता ९० तास काम करावे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा कामाचे तास किती असावेत, असा मुद्दा उपस्थित झाला. यावर उद्योग क्षेत्रातील अनेकांनी कामाचे जास्त तास म्हणजे जास्त उत्पादकता असे समीकरण नाकारले. काम आणि व्यक्तिगत आयुष्य यांचे संतुलन आवश्यक असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ आवर्जून सांगतात.
आयटीनगरी असा लौकिक निर्माण झालेल्या पुण्यातील अलीकडच्या काळातील घटना या कार्यसंस्कृतीतील बिघाडावर बोट ठेवणाऱ्या आहेत. कामाचा अतिताण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या तरुणांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे आता कंपन्यांनीच कार्यसंस्कृतीत सुधारणा करून कर्मचाऱ्यांचे काम आणि व्यक्तिगत जीवन संतुलन सुधारण्यावर भर द्यायला हवा. यातून भविष्यात कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहून त्यांची उत्पादकताही वाढेल. शेवटी कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरच या कंपन्यांचा डोलारा उभा आहे.
sanjay.jadhav@expressindia.com